तक्रारीची दखल घेऊन समाज कल्याण खात्याकडून मनपाला पत्र : वेळेवर यंत्रोपकरणे उपलब्ध नसल्याने हातानेच स्वच्छता
बेळगाव : मनपाचे स्वच्छता कर्मचारी मॅन्युअली ड्रेनेज चेंबरची स्वच्छता करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत जिल्हा जागृती निरीक्षण समितीच्या सदस्यांनी समाज कल्याण खात्याकडे तक्रार नोंदविली होती. याची दखल घेऊन याप्रकरणी चौकशी करून कारवाई करण्याचा आदेश समाज कल्याण खात्याच्या उपसंचालकांनी बजावला आहे.
शहरातील स्वच्छतेची कामे तसेच ड्रेनेज चेंबरच्या स्वच्छतेसाठी यंत्रोपकरणांचा वापर करण्यात यावा, तसेच मॅन्युअल स्कॅव्हेंजर नियमावलीचे पालन करण्याची सूचना महापालिकेला करण्यात आली आहे. मात्र याकडे दुर्लक्ष झाल्याने मॅन्युअल स्कॅव्हेंजर नियमावलीचे उल्लंघन होत आहे. महापालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना वेळेवर यंत्रोपकरणे उपलब्ध केली जात नाहीत. त्यामुळे स्वच्छता कामगारांना स्वत:च्या हाताने ड्रेनेज चेंबरची स्वच्छता करावी लागत आहे. शहरात विविध ठिकाणी असे प्रकार घडत असल्याचे जिल्हा जागृती निरीक्षण समितीच्या निदर्शनास आले आहे. यापूर्वीही असे प्रकार निदर्शनास आल्याने समितीचे सदस्य विजय निरगट्टी यांनी महापालिका आयुक्तांकडे तक्रार केली होती. याबाबत चौकशी करू इतकेच उत्तर महापालिका आयुक्त रुद्रेश घाळी यांनी दिले होते. त्यानंतर याबाबत कोणतीच चौकशी केली नाही. मात्र हॅण्डग्लोज किंवा सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक खबरदारी न घेताच तुंबलेल्या ड्रेनेज चेंबरची दुरुस्ती करताना महापालिकेचे स्वच्छता कर्मचारी निदर्शनास आले. दि. 1 फेब्रुवारी रोजी हा प्रकार शहरात निदर्शनास आल्याने जिल्हा जागृती निरीक्षण समितीचे सदस्य विजय निरगट्टी यांनी याबाबत समाज कल्याण खात्याकडे तक्रार नोंदविली होती.
तसेच याबाबतची छायाचित्रे समाज कल्याण खात्याकडे पाठविली होती. या तक्रारीची दखल समाज कल्याण खात्याने घेतली असून, या प्रकरणी महापालिका आयुक्तांना पत्र पाठविले आहे. मॅन्युअल स्कॅव्हेंजर नियमावलीचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आले असून, स्वच्छता कामगारांच्या सुरक्षेच्यादृष्टीने कोणतीच खबरदारी घेण्यात आली नसल्याचे नमूद केले आहे. स्वच्छता कामगारांना सुरक्षेची साधने उपलब्ध करून देण्याची जबाबदारी महापालिकेची असून, मॅन्युअल स्कॅव्हेंजरअंतर्गत जागृती करण्यात यावी. मॅन्युअल स्कॅव्हेंजर नियमावलीचे उल्लंघन केल्यास हा प्रकार शिक्षेस पात्र असल्याचे महापालिकेला पाठविण्यात आलेल्या पत्रात म्हटले आहे. या प्रकाराची चौकशी करून कारवाई करावी, असे समाज कल्याण खात्याच्या उपसंचालकांनी पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.









