महानगरपालिकेने कायमस्वरुपी तोडगा काढण्याची नितांत आवश्यकता : पकड मोहीम यशस्वी होत नसल्याने निष्पापांना फटका
बेळगाव : शहरातील मोकाट कुत्र्यांचा उपद्रव ही तमाम बेळगावकरांना डोकेदुखी होऊन बसली आहे. मनपातर्फे मोकाट कुत्री पकडण्याची मोहीम अनेकदा जाहीर होते. कार्यान्वित होते, पण ती यशस्वी होत नाही. याचा फटका निष्कारण निष्पाप नागरिकांना बसतो. शहराच्या कोणत्याही भागात रात्रीच्या वेळी ये-जा करणे धोक्याचे ठरले आहे. गुरुवारी एक-दोन नव्हे तर तब्बल अकरा जणांचा कुत्र्याने चावा घेतला. त्यापैकी पाचजण गंभीर जखमी झाले. शुक्रवारी सकाळी ‘तरुण भारत’मध्ये हे वृत्त प्रसिद्ध होताच त्या कुत्र्याला पकडण्यासाठी शोधमोहीम सुरू झाली. सामाजिक कार्यकर्ते संतोष दरेकर, बापट गल्लीतील तरुण आणि मनपाचे कर्मचारी या सर्वांनी मिळूनच कुत्र्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, कुत्र्याने कर्मचाऱ्यांना या गल्लीतून त्या गल्लीत असा गुंगारा देत पुरते दमविले आणि त्यांना पळता भुई थोडी करून सोडली.
हॉटेलमधून रात्रीच्यावेळी फेकले जाणारे अन्न हे मोकाट कुत्र्यांचे लक्ष्य आहे. त्यामुळे बहुसंख्य हॉटेल परिसरात रात्रीच्यावेळी कुत्री वावरत असतात. कुत्र्यांच्या नसबंदी मोहिमेचा नेहमीच फज्जा उडतो. या कुत्र्यांमुळे नागरिकांच्या झोपेचेही खोबरे होत आहे. दरम्यान, आपल्या घराची आणि आसपास लावलेल्या वाहनांच्या सुरक्षिततेसाठी घरमालक पाळीव कुत्र्यांनासुद्धा रात्रीच्यावेळी खुले सोडतात. त्यामुळे मोकाट कुत्री आणि या कुत्र्यांचा एकच गलका रात्रभर सुरू होऊन नागरिकांची झोपमोड होत आहे. कुत्र्यांना मारण्यासाठी प्राणीदया संघटना आक्षेप घेते. परंतु, त्यांचा पूर्ण बंदोबस्त करणे किंवा नागरिकांना त्यांच्यापासून त्रास होऊ नये यासाठी मात्र संघटना कोणतेच प्रयत्न करत नाही. या तिढ्यामुळे मनपा कर्मचारीसुद्धा कोणतीच आक्रमक भूमिका घेऊ शकत नाहीत. जोपर्यंत महानगरपालिका या कुत्र्यांसाठी कायमस्वरुपी तोडगा शोधत नाही, तोपर्यंत ही डोकेदुखी नागरिकांना सहन करावीच लागणार आहे.









