बेळगाव : शांतिनिकेतन पब्लिक स्कूल खानापूर आयोजित विद्याभारती जिल्हास्तरीय प्राथमिक व माध्यमिक मुला-मुलींच्या अॅथलेटिक्स स्पर्धेला खानापूर येथील शांतिनिकेतन पब्लिक इंग्रजी माध्यम शाळेच्या मैदानावर प्रारंभ झाला. स्पर्धेच्या उद्घाटनाला प्रमुख विद्याभारती जिल्हाध्यक्ष माधव पुणेकर, सचिव एस. व्ही. कुलकर्णी, संत मीरा शाळेच्या मुख्याध्यापिका सुजाता दप्तरदार, शांतिनिकेतन पब्लिक शाळेच्या मुख्याध्यापिका स्वातीकमळ वाटवे, मनिषा भोसले, विद्याभारती शारीरिक प्रमुख सी. आर. पाटील, स्पर्धा सचिव ओंकार गावडे आदी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन सरस्वती, ओंकार भारतमाता प्रतिमेचे पूजन करण्यात आले. पाहुण्यांचे हस्ते क्रीडाध्वजारोहण करण्यात आले.
खेळाडू वैष्णवी जोशेनकर, अनुष्का कौदलकर, प्रांजल राव, आदिनाथ पत्यूश यांनी मैदानाभोवती क्रीडाज्योत फिरवून पाहुण्यांच्याकडे सुपूर्द केली. प्रांजल राव हिने सहभागी खेळाडूंना शपथ दिली. यानंतर पाहुण्यांनी खेळाडूंना मार्गदर्शन करुन शुभेच्छा दिल्या. स्पर्धेत विद्याभारती बेळगाव जिल्हास्तरीय संलग्नित संत मीरा इंग्रजी माध्यम शाळा अनगोळ, हनिवेल इंग्रजी माध्यम शाळा खानापूर, शांतिनिकेतन पब्लिक स्कूल, स्वामी विवेकानंद हायस्कूल खानापूर, संत मीरा इंग्रजी माध्यम स्कूल गणेशपुर, देवेंद्र जिनगौडा स्कूल शिंदोळी शाळेचे प्राथमिक व माध्यमिक मुला – मुलींच्या संघानी सहभाग घेतला आहे. या स्पर्धेत 100 मी., 200, 400, 600, 800 मी., 1500, 3000 व 5000 मी. धावणे, 4×100 मी. रिले, 100 व 80 मी. अडथळा शर्यत, गोळाफेक, थाळीफेक, भालाफेक, हतोडाफेक, लांबउडी, उंचउडी, तिहेरी उडीचा समावेश होता. यापूर्वी सांघिक स्पर्धा पूर्ण झाल्या आहेत. स्पर्धेतील विजेते खेळाडू विद्याभारती राज्यस्तरीय अॅथलेटिक्स स्पर्धेसाठी पात्र ठरतील.









