सचिवपदी सुलक्षणा शिनोळकर : आज अधिकार समारंभ
प्रतिनिधी/ बेळगाव
महिला आणि मुलींसाठी काम करणाऱ्या जायंट्स सखी या सेवाभावी संघटनेच्या अध्यक्षपदी विद्या सरनोबत यांची तर सचिवपदी सुलक्षणा शिनोळकर यांची दुसऱ्यांदा निवड झाली आहे. रविवार दि. 2 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता गॅलेक्सी हॉल येथे अधिकारग्रहण समारंभ होणार आहे.
संघटनेच्या उपाध्यक्षपदी अपर्णा पाटील आणि शीतल पाटील तर खजिनदारपदी राजश्री हसबे यांची निवड झाली आहे. संचालक म्हणून लता कंग्राळकर, वृषाली मोरे, वैशाली भातकांडे, ज्योती सांगुकर, शीला खटावकर, अर्चना कंग्राळकर यांची निवड झाली आहे. अध्यक्षा विद्या सरनोबत यांनी कंग्राळ गल्लीतील एकता महिला मंडळाच्या अध्यक्षा म्हणून काम पाहिले आहे. त्या दोन वर्षे सखीच्या उपाध्यक्ष होत्या.

सचिव सुलक्षणा शिनोळकर पदवीधर असून शिवाजी उद्यानातील सुहास्य क्लबच्या पदाधिकारी आहेत. उपाध्यक्षा अपर्णा पाटील पदवीधर असून बाग परिवारच्या सदस्या आहेत. शीतल पाटील पदवीधर असून त्या नर्सरी स्कूल चालवतात. त्यांनी या अगोदर सखीच्या सचिव म्हणून काम पाहिले आहे.
खजिनदार राजश्री हसबे पदवीधर असून त्या अकौंटंट म्हणून खासगी नोकरी करतात. सखीच्या संचालिका म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. अधिकारग्रहण समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून जायंट्स वेल्फेअर फौंडेशनचे विशेष समिती सदस्य मोहन कारेकर आणि मदन बामणे उपस्थित राहणार असून प्रमुख वक्त्या म्हणून ज्योती सेंट्रल स्कूलच्या मुख्याध्यापिका मायादेवी अगसगेकर उपस्थित राहणार आहेत.









