वृत्तसंस्था/ भोपाळ
अझरबैजानमधील बाकू येथे 8 ते 15 मे दरम्यान होणाऱ्या आयएसएसएफच्या विश्वचषक रायफल आणि पिस्तूल नेमबाजी स्पर्धेसाठी अखिल भारतीय रायफल संघटनेने 22 जणांचा संघ जाहीर केला असून त्यामध्ये शाहू तुषार माने आणि शिवा नरवाल यांना मात्र वगळण्यात आले आहे.
2023 च्या हंगामातील आयएसएसएफची ही चौथी विश्वचषक नेमबाजी स्पर्धा आहे. अलीकडेच भोपाळमध्ये झालेल्या आयएसएसएफच्या तिसऱ्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत भारतीय नेमबाजांची कामगिरी समाधानकारक झाली होती. दरम्यान, पेरूची राजधानी लिमा येथे 11 एप्रिल रोजी होणाऱ्या आयएसएसएफच्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत भारत सहभागी होणार नाही.
भोपाळमध्ये झालेल्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत सहभागी झालेल्या भारतीय संघामध्ये शाहू तुषार माने आणि शिवा नरवाल यांचा समावेश होता. मानेने पुरुषांच्या 10 मी. एअर रायफल नेमबाजीत तर शिवा नरवालने पुरुषांच्या 10 मी. एअर पिस्तूल नेमबाजीत सहभाग दर्शविला होता. त्याचप्रमाणे बाकूमध्ये होणाऱ्या स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या भारतीय संघामध्ये महिलांच्या विभागात किरकोळ बदल करण्यात आला आहे. महिलांच्या 10 मी. एअर पिस्तूल नेमबाजी प्रकारासाठी मनू भाकरच्या जागी इशा सिंगला संधी देण्यात आली आहे. भोपाळमध्ये झालेल्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत मनू भाकरने महिलांच्या 25 मी. पिस्तूल नेमबाजीत कांस्यपदक मिळविले होते. भारताचे एअर रायफल आणि एअर पिस्तूल प्रकारातील नेमबाज आता आगामी राष्ट्रीय निवड चाचणी स्पर्धेसाठी सराव करीत असल्याने ते बाकूमधील स्पर्धेत सहभागी होणार नाहीत. राष्ट्रीय निवड चाचणी स्पर्धा भोपाळमध्ये होणार आहे.









