वार्ताहर /उचगाव
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान उचगावतर्फे, शिवकालीन युद्धकला व स्वसंरक्षणार्थ शिकलेल्या मुला-मुलींच्याकडून लाठी-काठी, भाला, रणवार आणि भारतीय व्यायामाचे सादरीकरण समारंभ तसेच शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान खानापूर दक्षिण विभाग प्रमुख धारकरी रत्नाकर हनुमंत निलजकर यांचे खास शिवचरित्रावर व्याख्यान असा संयुक्त कार्यक्रम उचगाव येथील गणेश विठ्ठल रखुमाई मंदिराच्या प्रांगणात खास दीपावलीनिमित्त पार पडला. प्राथमिक, माध्यमिक, विभागातील 120 मुलामुलींनी सादरीकरण करून नागरिकांच्या डोळ्याचे पारणे फेडले. अन् उपस्थित नागरिकांची मने जिंकली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उचगाव ग्रामपंचायतीच्या अध्यक्षा मथुरा बाळकृष्ण तेरसे होत्या. कार्यक्रमाला ग्रामपंचायत उपाध्यक्ष बाळकृष्ण तेरसे, माजी ग्रामपंचायत सदस्य बी. एस. होनगेकर, मराठा बँकेचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक लक्ष्मणराव होनगेकर, ग्रामपंचायत सदस्य एल. डी. चौगुले, गजानन नाईक, योगिता देसाई, अमर जाधव उपस्थित होते. उपस्थितांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन, दीपप्रज्वलन, लाठी-काठी, भाला, रणवारचे पूजन, शस्त्रपूजन तसेच करेला पूजन करण्यात आले. यावेळी धारकरी युवकानी श्लोक व आरती सादर केली.
लाठी-काठी प्रकारांचे सादरीकरण
यावेळी 15 संघांनी वेगवेगळ्या प्रकारच्या लाठी-काठी प्रकारांचे सादरीकरण केले. यावेळी रत्नाकर निलजकर यांनी विचार मांडले. भारतीय सेनेमध्ये कार्यरत असलेले मयूर सुळगेकर यांनी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानला पाच करेला भेटी दाखल दिल्याबद्दल त्यांचा यावेळी सत्कार केला. लाठी-काठी पथकामध्ये भाग घेतलेल्या सर्व मुलांमुलींना प्रशस्तीपत्रे देऊन त्यांचा गौरव केला. सूत्रसंचालन एन. ओ. चौगुले यांनी करून आभार मानले.









