पाच दशकांपासून लायन्सने भरीव सामाजिक कार्य केल्याची माहिती
बेळगाव : लायन्स क्लब ऑफ बेळगाव-टिळकवाडीचे यंदा सुवर्णमहोत्सवी वर्ष असून यानिमित्त शनिवार दि. 18 रोजी पै रिसॉर्ट येथे सायंकाळी 5 वाजता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. 1917 मध्ये स्थापन झालेल्या लायन्स इंटरनॅशनलशी आपला क्लब 317 ब गोवा आणि उत्तर कर्नाटकाशी संलग्न असून पाच दशकांपासून लायन्सने भरीव सामाजिक कार्य केल्याची माहिती सुवर्ण महोत्सव आयोजन समितीचे अध्यक्ष ला. श्रीकांत शानभाग यांनी दिली. पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले, गेल्या काही वर्षात क्लबने शंभरहून अधिक नेत्रतपासणी शिबिरे घेतली व पाच हजारहून अधिक मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया केल्या. शिबिरामुळे एक हजारहून अधिक विद्यार्थ्यांना लाभ झाला आहे. दीडशेहून अधिक आरोग्य तपासणी शिबिरे घेतली आहेत. लायन्स क्लब बेळगाव-टिळकवाडीने तीन लाखांहून अधिक किमतीची नोटबुक वितरित केली असून लायन्स क्वेस्ट अंतर्गत 350 शिक्षकांना प्रशिक्षित केले आहे. याशिवाय प्रश्नमंजुषा, खो-खो स्पर्धा, मिस्टर इंडिया व एशिया, वृक्षारोपण असे उपक्रम राबविले आहेत. आपत्ती काळात पूरग्रस्तांना 75 लाखांहून अधिक किमतीचे साहित्य वाटप करून क्लबने सामाजिक बांधिलकी जपली आहे. मतिमंद मुला-मुलींसाठी व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र स्थापन केले असून आजपर्यंत 4 हजारहून अधिक युनिट रक्तसंकलन केले आहे, अशी माहिती ला. अरविंद संगोळ्ळी यांनी दिली. याप्रसंगी आयोजन समितीचे अध्यक्ष अरविंद देशपांडे, उपाध्यक्ष व्ही. आर. भांदुर्गे, मधुकर मोटर, मल्लारी दिवटे, प्रथमेश टपाले आदी उपस्थित होते.
या मान्यवरांची उपस्थिती
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी आंतरराष्ट्रीय अध्यक्ष नरेश अगरवाल तसेच नियोजित अध्यक्ष वमसीधर बाबू, मल्टिपल कौन्सिल चेअरमन राजशेखरय्या बी. एस., प्रांतपाल ज्योज फ्रान्सिस्को उपस्थित राहणार आहेत. तसेच ला. सुगल्ला यरमली, ला. मनोज माणेक व ला. जयामोल नाईक उपस्थित राहणार आहेत.









