सीआरपी, बीआरपी पदे अनेक दिवसांपासून रिक्त
बेळगाव : गट शिक्षणाधिकारी कार्यालय व यांच्यातील सेतू म्हणून काम करणारे सीआरपी (ग्रुप रिसोर्स पर्सन) व बीआरपी (फिल्ड रिसोर्स पर्सन) ची पदे रिक्त आहेत. त्यामुळे कोणत्याही योजना अथवा शैक्षणिक वृद्धीसाठीचे उपक्रम राबविताना गटशिक्षणाधिकारी कार्यालयाला अडथळे येत आहेत. शहरासह तालुक्यातदेखील बीआरपी व सीआरपी यांची पदे रिक्त असल्यामुळे याचा परिणाम शैक्षणिक प्रगतीवर होत आहे. सरकारी शाळांमधील गुणवत्ता वाढावी यासाठी राज्य सरकारकडून अनेक प्रयत्न होत असताना नवीन उपक्रम शाळांपर्यंत पोहोचविण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे अधिकारीच नसल्याने हे उपक्रम तितक्याशा प्रभावीपणे राबविले जात नसल्याचे दिसून येत आहे.
राज्य सरकारच्या शिक्षण विभागाकडून मध्यान्ह आहार, अपार नेंदणी, सरकारी उपक्रम राबविण्यासंदर्भात बीआरपी व सीआरपी यांची महत्त्वाची भूमिका असते. बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यामध्ये 28 सीआरपींची पदे रिक्त आहेत. तर बीआरपीची चार पदे रिक्त असल्यामुळे याचा परिणाम शाळांवर होताना दिसत आहे. शाळांमध्ये काम करताना अनेक अडचणी येत असताना त्या अडचणी गटशिक्षणाधिकारी कार्यालयापर्यंत सीआरपी, बीआरपींच्या मार्फत मुख्याध्यापक मांडत असतात. शहर तसेच तालुक्यात सरकारी शाळांची संख्या कमी होत असल्यामुळे एका सीआरपीवर दोन विभागांची जबाबदारी देण्यात आली आहे. मागील वर्षी सीआरपी पदाची निवड करताना मराठी शिक्षकांवर अन्याय झाल्याची तक्रार करण्यात आली होती.
सीआरपी, बीआरपींचे काम काय?
शाळा व गटशिक्षणाधिकारी कार्यालय यांच्यामध्ये समन्वय ठेवणे हे यांचे प्रमुख काम असते. त्याचबरोबर शाळांपर्यंत उपक्रमांची माहिती पोहोचविणे, शिक्षकांना प्रशिक्षण देणे, एखाद्या उपक्रमाची अंमलबजावणी करणे, चार ते पाच क्लस्टरसाठी एका बीआरपीची निवड केलेली असते. सीआरपींकडून माहिती जमा करून ती शिक्षण विभागापर्यंत पोहोचविण्याचे त्यांचे महत्त्वाचे काम असते.
रिक्त पदांवर ज्येष्ठतेनुसार निवड
सीआरपी, बीआरपी यांची रिक्त पदे दरवर्षी भरली जातात. रिक्त पदांवर ज्येष्ठतेनुसार निवड केली जाते. काही ठिकाणी पदे रिक्त आहेत. त्याठिकाणी इतर अधिकाऱ्यांवर पदभार सोपविण्यांवर आला आहे. रिक्त पदांचा शैक्षणिक प्रगतीवर परिणाम होणार नाही याची काळजी शिक्षण विभागाकडून घेण्यात आली आहे.
-लीलावती हिरेमठ (जिल्हा शिक्षणाधिकारी)









