लढाऊ वैमानिकांचे बिडेन यांच्याकडून अभिनंदन ः चीनचा अमेरिकेला इशारा
वृत्तसंस्था / वॉशिंग्टन
8 दिवसांपासून अमेरिकेच्या हवाईक्षेत्रात असलेल्या चीनच्या हेरगिरी फुग्याला अमेरिकेच्या वायुदलाने अखेर नष्ट केले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांनी यासंबंधी कारवाईचे आदेश दिले होते. अमेरिकेच्या एफ-22 लढाऊ विमानांनी या फुग्यावर हल्ला केला आहे. बिडेन यांनी स्वतःच्या लढाऊ विमानांचे अभिनंदन केले आहे.
अमेरिकेच्या कारवाईवर चीनने तीव्र आक्षेप दर्शविला आहे. अमेरिकेने आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन केले आहे. आमच्याकडे देखील कारवाईचा अधिकार आहे. आम्ही देखील आवश्यक ती कारवाई करू शकतो असे चीनने म्हटले आहे.
चीनचा हा फुगा 28 जानेवारी रोजी अमेरिकेच्या हवाईक्षेत्रात दाखल झाला होता. तर 3 फेब्रुवारी रोजी मोंटानाच्या हवाईक्षेत्रात दिसून आला होता, मोंटाना हे अमेरिकेचे आण्विक क्षेपणास्त्रांचे स्थळ आहे. चीनचा हा फुगा हेरगिरी करत असल्याचा संशय अमेरिकेला होता. याचमुळे त्याच्यावर नजर ठेवली जात होती.
चीनच्या या फुग्यामुळे दोन्ही देशांदरम्यान राजनयिक संकट निर्माण झाले आहे. अमेरिकेचे विदेशमंत्री एंटनी ब्लिंकेन यांनी चीनचा प्रस्तावित दौरा रद्द केल्याचे समजते. ब्लिंकेन हे रविवारपासून दोन दिवसीय दौऱयानिमित्त चीनला जाणार होते. तर चीनने अमेरिकेचा हेरगिरीचा आरोप फेटाळला होता. संबंधित फुगा हा हेरगिरी करणारा नसून नागरी एअरशिप आहे. याचा वापर केवळ हवामानाची माहिती मिळविण्यासाठी होतो असा दावा चीनने केला होता.
आम्ही कधीच कुठल्याही देशाची सीमा किंवा हवाईक्षेत्राचे उल्लंघन केलेले नाही. अमेरिकेचे काही नेते आणि प्रसारमाध्यमे या घटनेच्या आडून चीनची प्रतिमा मलीन करू पाहत आहे. हा विषय शांततेत निकाली काढला जावा असे चीनच्या विदेशमंत्रालयाने म्हटले होते.
बिडेन यांच्या आदेशानुसार कारवाई
बलून नष्ट करण्याचा आदेश दिला असल्याचे बिडेन यांनी म्हटले होते. यानंतर लोकांना धोका होणार नाही अशा भागात हा फुगा पोहोचल्यावर लढाऊ विमानांनी तो नष्ट करण्याची कारवाई केली आहे. तत्पूर्वी संबंधित भागातील हवाई वाहतूक रोखण्यात आली होती. चीनचा फुगा 60-65 हजार फुटांच्या उंचीवर असताना अमेरिकेच्या एफ-22 लढाऊ विमानाने त्याच्यावर हल्ला केला. नष्ट झालेल्या फुग्याचे अवशेष नौदल अन् तटरक्षक दलाकडून शोधले जाणार आहेत. चीनचा हा फुगा तीन बसेसच्या आकाराइतका होता.









