गुजरातची हर्षिता गोयल दुसऱ्या स्थानी : यशस्वी उमेदवारांचे गुण लवकरच जाहीर होणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
केंद्रीय लोकसेवा आयोगाने (युपीएससी) नागरी सेवा परीक्षा 2024 चा अंतिम निकाल जारी केला आहे. या परीक्षेत प्रयागराज येथील शक्ती दुबेने देशात पहिला क्रमांक मिळविला आहे. शक्ती दुबेने 2018 पासूनच युपीएससीसाठी तयारी सुरू केली होती. तर दुसऱ्या स्थानावर हर्षिता गोयल तर तिसऱ्या स्थानावर अर्चित डोंगरे राहिला आहे. शक्ती दुबे हिने अलाहाबाद विद्यापीठातून पदवी मिळविली आहे. बनारस हिंदू विद्यापीठातून तिने जीवशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण प्राप्त केले आहे. 2018 साली पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यावर तिने युपीएससीची तयारी सुरू केली होती. तर दुसऱ्या क्रमांकावर राहिलेली हर्षिता ही गुजरातच्या वडोदरा येथील असून ती सीए आहे. 1129 रिक्त पदांसाठी एकूण 1009 उमेदवारांची शिफारस करण्यात आली असून यातील 335 सामान्य प्रवर्गातील आहेत. 109 ईडब्ल्युएस, 318 ओबीसी, 160 अनुसूचित जातीचे, 87 अनुसूचित जमात प्रवर्गाचे आहेत. ‘
उमेदवारांचे गुण सुमारे 15 दिवसांनी जारी केले जाणार आहेत. 17 एप्रिल 2025 पर्यंत युपीएससी नागरी सेवा परीक्षेच्या मुलाखती चालल्या होत्या मुख्य परीक्षेत यशस्वी ठरलेल्या सुमारे 2845 उमेदवारांना मुलाखतीसाठी पाचारण करण्यात आले होते. युपीएससीने नागरी सेवा परीक्षा 2024 अंतर्गत आयएएस, आयपीएस समवेत सेवेत 1132 पदांवर भरती प्रकिया सुरू केली होती. पहिल्या मूळ अधिसूचनेत देखील 1056 रिक्त पदांचा उल्लेख होता, परंतु नंतर हे प्रमाण वाढवून 1132 करण्यात आले. नागरी सेवा परीक्षा नियम 2024 च्या नियम 20 (4) आणि (5) नुसार 230 उमेदवारांची एक राखीव यादी देखील ठेवली आहे. यात सामान्य प्रवर्गातील 115, ईडब्ल्यूएस श्रेणीतील 35, ओबीसीतील 59, अनुसूचित जात प्रवर्गाचे 14, अनुसूचित जमात प्रवर्गाचे 06 उमेदवार सामील आहेत. एकूण 1129 पदांपैकी 180 पदे आयएएसची आहेत. 55 पदे आयएफएफएस आणि 147 आयपीएसची आहेत. सेंट्रल सर्व्हिसेस ग्रुप ए चे 605 आणि ग्रुप बी सर्व्हिसेसची 142 पदे आहेत.
युपीएससी परीक्षेतील टॉपर…
क्रमांक नाव
- 1 शक्ती दुबे
- 2 हर्षिता गोयल
- 3 अर्चित पराग डोंगरे
- 4 मार्गी शाह
- 5 आकाश गर्ग
- 6 कोमल पुनिया
- 7 आयुषी बन्सल
- 8 राजकृष्ण झा
- 9 आदित्य अग्रवाल
- 10 मयंक त्रिपाठी









