खडी पसरून ठेवल्याने भाविकांतून नाराजी : वाहने घसरून अपघातांच्या प्रमाणात वाढ
वार्ताहर /उचगाव
मळेकरणी देवस्थानकडे जाणाऱ्या रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी खडी पसरवून ठेवली आहे. मात्र, ठेकेदाराने अद्याप कामाचा शुभारंभ केला नसल्याने भाविक आणि नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे. येथील मळेकरणी देवस्थानच्या यात्रेसाठी हजारो भाविक मंगळवार, शुक्रवारी येत असतात. येत्या दोन महिन्यात यात्रा करण्यासाठी मोठी गर्दी असते. मात्र, या देवस्थानकडे ये-जा करण्यासाठी ठेकेदाराने रस्ता खणून खडी पसरवली आहे. या खडीवरून दुचाकी वाहने घसरून अनेकजण जखमी झाले आहेत. सदर रस्त्याचे कांक्रिटीकरण करण्यात येणार आहे. मात्र, अर्धवट कामामुळे सध्या भक्तांना त्रास सहन करावा लागत आहे. या मार्गावरील छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना या रस्त्यावरील धुळीचा सामना करण्याची वेळ आली आहे. सदर रस्त्यावर पाणीही मारण्यात येत नसल्याने कडक उन्हात धुळीचे लोट उडत आहेत. यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.
रस्ताकाम तातडीने पूर्ण करण्याची मागणी
सदर रस्ता उचगाव, कोनेवाडी, तुरमुरी या गावांच्या रस्त्याला जोडणारा आहे. अनेक शेतकऱ्यांची शेती मळेकरणी देवीच्या आमराईच्या मागील बाजूला असून शेतवडीत जाण्यासाठी हा मार्ग महत्त्वाचा आहे. तरी तातडीने या रस्त्याचे काँक्रिटीकरण करावे, अशी मागणी ग्रामस्थ, शेतकरी व भक्तांतून करण्यात येत आहे.









