बेळगाव : नशामुक्त बेळगावसाठी पोलिसांची मोहीम सुरूच आहे. धामणे रोड वडगाव परिसरात गांजा विकणाऱ्या दोन तरुणांना शहापूर पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याजवळून 1 किलो 115 ग्रॅम गांजा जप्त केला आहे. पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. प्रथमेश महेश कणबरकर (वय 22 रा. गणेशपूर गल्ली शहापूर), अनिकेत ज्ञानेश्वर पोटे (वय 26, रा. जोशी गल्ली, शहापूर) अशी अटक करण्यात आलेल्या दोघा जणांची नावे आहेत. गुरुवार दि. 26 जून रोजी सायंकाळी 5.30 च्या सुमारास सिद्धारुढ कॉलनी परिसरात ही कारवाई करण्यात आली.
मार्केटचे प्रभारी एसीपी सदाशिव कट्टीमनी, पोलीस निरीक्षक एस. एस. सिमानी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मणिकंठ पुजारी, साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बी. ए. चौगला, नागराज ओसप्पगोळ, बी. एस. वीरमुख, संदीप बागडी, श्रीशैल गोकावी, अजित शिपुरे, सुरेश लोकुरे आदींनी ही कारवाई केली आहे. या दोघांवर शहापूर पोलीस स्थानकात अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. केए 22 एचक्यू 0342 क्रमांकाच्या दुचाकीच्या डिक्कीत गांजा ठेवून त्याची विक्री करण्यासाठी हे दोघे निघाले होते. यासंबंधीची माहिती मिळताच पोलिसांनी छापा टाकून त्यांना अटक केली. प्रथमेश हा इलेक्ट्रिकल बाईक स्पेअर मॅनेजर काम करतो. तर अनिकेत हा इलेक्ट्रिशियन आहे, असे पोलिसांनी सांगितले. शहापूर पोलीस पुढील तपास करीत आहेत.









