महानगरपालिका आयुक्त शुभा बी. यांची सूचना : मुख्य लेखापाल प्रशासन व्यवस्थापक करणार चौकशी
बेळगाव : महानगरपालिकेतील एका प्रथम दर्जा साहाय्यकासह आणखी एका द्वितीय दर्जा साहाय्यकाची खातेनिहाय चौकशी करून एक महिन्याच्या आत अहवाल देण्याचा आदेश महापालिका आयुक्त शुभा बी. यांनी बजावला आहे. चौकशी अधिकारी म्हणून महापालिकेचे मुख्य लेखापाल आणि प्रशासन विभागाचे व्यवस्थापक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मनपा आयुक्तांनी बजावलेल्या खातेनिहाय चौकशीच्या आदेशामुळे महानगरपालिकेत एकच खळबळ उडाली आहे. 19 फेब्रुवारी 2020 रोजी बेळगाव महापालिकेत प्रथम दर्जा साहाय्यक म्हणून झालेल्या एका अधिकाऱ्याने राजकीय दबावाचा वापर करून प्रथम दर्जा महसूल निरीक्षक हुद्दा मिळविला.
आपल्याला सोयीस्कर होणाऱ्या आठ प्रभागांमध्ये तीन वर्षे राजकीय प्रभाव, संघटना, वरिष्ठ अधिकारी यांचा वापर करून लोकनियुक्त सदस्यांनी प्रश्न विचारल्यास संघटनांच्या माध्यमातून दबाव आणण्यासह भांडण-तंटे लावण्याचे काम केले. एका माजी नगरसेवकाला महानगरपालिकेच्या जागेत अतिक्रमण करण्यास मदत केली. सरकारी सेवा बजावताना यांनी हे काम केले आहे. लोकांना पीआयडी, खाता बदल करून देण्यासाठी 1 ते 2 महिने विलंब लावून त्रास दिला. महिला वसती केंद्रात जाऊन असभ्य वर्तन केले. येडियुराप्पा रोडवर एक ते दोन एकर जागा एका विशिष्ठ जातीच्या लोकांना देऊन त्यांना अद्यापही कागदपत्रे दिली नाहीत. आपल्या नावे 20 गुंठे जागा करून घेतली आहे.
सदर जागेबाबत विचारणा करण्यास गेले असता. गुंडाकरवी धमकी दिली जात आहे. याबाबत शहापूर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्या विरोधात नागरिकांनी अनेकवेळा महानगरपालिकेकडे तक्रार दिले आहे. मात्र त्यांच्याविरुद्ध कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे करण्यात आलेल्या आरोपांच्या आधारावर संबंधीत प्रथम दर्जा सहाय्यकावर योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी तक्रार एका युवक मंडळाच्यावतीने 12 जानेवारी 2024 ला महापालिकेला देण्यात आली होती. त्यानुसार महसूल उपायुक्त आणि प्रशासन उपायुक्त यांना या प्रकरणाची चौकशी करून अहवाल देण्याची सूचना करण्यात आली होती.
यानंतर प्रभाग क्र. 9 मध्ये प्रथम दर्जा सहाय्यक व द्वितीय दर्जा साहाय्यकांनी वडगाव येथील एनए झालेल्या खुल्या जागेत नकाशा नसतानाही तशा मिळकतीला अनधिकृतपणे फॉर्म नं. 2 देऊन (अनअसेस्ड) पीआयडी म्हणून तयार करायला हवे होते. परंतु पीआयडी क्र. 88056 हा अधिकृत (असेस्ड) म्हणून तयार करण्यात आला आहे. फॉर्म क्र. 2 हा 28 सप्टेंबर 2021 रोजी देण्यात आला आहे. त्यामुळे 16 एप्रिल 2024 रोजी त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. सदर मिळकत एन ए आणि आरटीशीमध्ये नमूद आहे. या आधारावर सदर मिळकतीला फॉर्म नं. 1 आणि फॉर्म नं. 2 देण्यात आल्याचे लेखी उत्तर देण्यात आले.
परंतु सदर कागदपत्रे, देण्यात आलेल्या प्रती किंवा पुरावे देण्यात आले नाही. त्यामुळे कागदपत्रे हजर करण्यासंदर्भात 16 मे 2024 रोजी नोटीस बजावण्यात आली. त्यानंतर 24 जून 2024 रोजी पुन्हा नोटीस देण्यात आली. सदर व्यक्तींनी आतापर्यंत देण्यात आलेल्या पुरेशा वेळेत दिलेले लेखी उत्तर वाजवी ठरत नाही. त्यामुळे सदर व्यक्ती विरुद्ध खातेनिहाय चौकशी करण्याचा आदेश महापालिका आयुक्त शुभा बी. यांनी बजावला आहे. त्यामुळे महापालिकेचे मुख्य लेखापाल व प्रशासन विभागाचे व्यवस्थापक तपास अधिकारी म्हणून चौकशी करणार आहेत. चौकशी अहवाल एक महिन्याच्या आत सादर करण्याची सूचनादेखील करण्यात आली आहे.
महसूल निरीक्षकाला हृदयविकाराचा झटका
महानगरपालिकेतील महसूल विभागात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांवर दिवसेंदिवस कामाचा ताण वाढत चालला आहे. त्यातच एका महसूल निरीक्षकाला शुक्रवारी हृदयविकाराचा झटका आला असून त्यांना एका खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. या प्रकारामुळे महसूल विभागात चिंता व्यक्त केली जात आहे.









