कोल्हापूर
रस्त्यावर पडलेली चाळीस ग्रॅम वजनाचे सोन्याचे सौभाग्याचं लेणं (मंगळसूत्र) आणि 200 रुपयांची रोकड असा ऐवज असलेली पर्स, राणी राहुल घोलप, सपना अमर दंडवते (दोघी रा. राजेंद्रनगर, कोल्हापूर) दोन महिलांना सापडली. त्या दोन महिलांनी मनाचा प्रामाणिक दाखवित ही पर्स राजारामपुरी पोलिसांना दिली. पोलिसांनी त्या पर्सच्या मालकीचा शोध घेवून, ती पर्स शोभा उर्फ संगीता दत्तात्रय चोडणकर (वय 60, रा. सुर्वेनगर, कळंबा, ता. करवीर) या वयोवृध्द महिलेला परत केली. यानंतर पोलिसांनी किंमती ऐवजाची पर्स परत देणाऱ्या राणी घोलप, सपना दंडवते या दोन महिलांचा पोलीस दलाच्या वतीने गुरुवारी सत्कार केला.
शोभा उर्फ संगीता चोडणकर ही वृध्द महिला बुधवारी एका कार्यक्रमानिमित्त शहरातील टेंबलाईवाडी परिसरात गेल्या होत्या. त्यावेळी त्यांची चाळीस ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र आणि 200 रुपयांची रोकड असा ऐवज असलेली पर्स टेंबलाईवाडी नाका केएमटी बस स्टॉप परिसरात गहाळ झाली होती. ती पर्स या परिसरातून येत असलेल्या राणी घोलप आणि सपना दंडवते या महिलांना सापडली. त्यांनी ती पर्स राजारामपुरी पोलीस ठाण्यात येऊन, पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्याकडे प्रामाणिकपणे सुपूर्द केली. तसेच पोलिसांनी दागिन्यांची पर्स शोभा उर्फ संगीता चोडणकर या वृध्देला परत दिली.
Previous Articleवेळीच आत्मचिंतन न केल्याने ‘उबाठा’ला खिंडार
Next Article कोल्हापूर खंडपीठासाठी आमरण उपोषण सुरू








