खंडपीठाबाबत ठोस निर्णय होईपर्यंत माघार नाही
माणिक पाटील चुयेकर यांचा निर्धार
कोल्हापूर
मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापुरात स्थापनेबाबतचा ठोस निर्णय झाल्याशिवाय आता माघार घ्यायची नाही असा निर्धार रविवारी पदवीधर मित्र या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माणिक पाटील – चुयेकर यांनी केला. याबबातचा निर्णय झाल्याशिवाय आमरण उपोषण मागे घेणार नसल्याचा निर्धारही यावेळी त्यांनी केला. दसरा चौक येथे रविवारी दिवसभर उपोषणासाठी विविध पक्ष, संघटनांनी पाठिंबा दिला.
कोल्हापूर येथे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ व्हावे यासाठी कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथील नागरिक, पक्षकार, वकील आणि संघटना गेल्या 30 वर्षापासून लढा देत आहेत. मोर्चा, आंदोलने, काम बंद आंदोलनासह विविध मार्गाने आंदोलन करुन राज्य शासनाचे लक्ष वेधण्याचे काम सुरु आहे. मात्र अद्यापही हा प्रश्न प्रलंबीत आहे. या प्रश्नावर लक्ष वेधण्याकरिता पदवीधर मित्रचे अध्यक्ष माणिक पाटील – चुयेकर यांनी रविवार पासून आमरण उपोषण सुरु केले आहे. दसरा चौक येथे हे उपोषण सुरु करण्यात आले आहे.
यावेळी बोलताना महाराष्ट्र गोवा बार कॉन्सिलचे माजी अध्यक्ष अॅङ महादेव आडगुळे म्हणाले, गेल्या 30 वर्षापासून कोल्हापूरसह सहा जिह्यातील वकील आणि पक्षकार कोल्हापूर खंडपीठासाठी लढा देत आहेत. मात्र अद्यापही या प्रश्नी सरकारने तोडगा काढलेला नाही. आता लढा अंतिम टप्प्यात आला असून, माणिक पाटील चुयेकर यांच्या आंदोलनामुळे या लढ्याला बळ मिळणार आहे. जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅङ सर्जेराव खोत म्हणाले, खंडपीठ प्रश्नावरुन सरकार सकारात्मक असल्याचे केवळ सांगत आहे. मात्र मुख्यमंत्र्यांकडे मुख्यन्यायमूर्तींना भेटण्यासाठी वेळ नसल्याचे दिसत आहे. यामुळे मुख्यमंत्र्यांनी तातडीने कृती समितीला भेटीची वेळ द्यावी त्याचसोबत मुख्य न्यायमूर्तींसोबत बैठक घेऊन खंडपीठ प्रश्नी सकारात्मक तोडगा काढण्याची मागणी केली.
रविवारी दिवसभरात माजी अध्यक्ष अॅङ गिरीश खडके, अॅङ सुभाष पिसाळ, वैशाली पाटील, डॉ. रविंद्र मोरे, अॅङ सागर घोरपडे, अॅङ निशिकांत पाटोळे, उदय लाड, किशोर घाटगे यांच्यासह विविध पक्ष संघटना यांनी भेट देवून आंदोलनास पाठिंबा दिला.
Previous Articleदोन महिलांनी दिले वृध्देला सौभाग्याचं लेणं
Next Article जिल्ह्यात 365 दिवस बंदी आदेश!








