कलबुर्गी-जेवर्गीतील घटना : धूळ, प्लास्टिक उडाल्याने अडथळा
प्रतिनिधी/ बेंगळूर
माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांचे हेलिकॉप्टर हेलिपॅडवर उतरविताना समस्या निर्माण झाल्याची घटना घडली आहे. सोमवारी विजय संकल्प रथयात्रेत सहभागी होण्यासाठी कलबुर्गी जिल्ह्यातील जेवर्गी येथे येडियुराप्पा हेलिकॉप्टरने दाखल झाले. हेलिकॉप्टर उतरविताना हेलिपॅडच्या आजूबाजूला असणारी धूळ आणि प्लास्टिक पिशव्या उडाल्या. त्यामुळे हेलिकॉप्टर उतरविण्यात अडथळा निर्माण झाला. शिवाय गोंधळही निर्माण झाला.
येडियुराप्पा जेवर्गीला विजय संकल्प यात्रेत सहभागी होण्यासाठी येणार असल्याने जवळच तात्पुरते हेलिपॅड निर्माण करण्यात आले होते. आजूबाजूला शेती होती. शिवाय शेतकऱ्यांनी तेथे प्लास्टिक अंथरले होते. हेलिकॉप्टरच्या पात्यांमुळे हे प्लास्टिक मातीसह उडाल्याने समस्या निर्माण झाली. पायलटने प्रसंगावधान राखून हेलिकॉप्टर पुन्हा वर नेले. पोलीस व सुरक्षा कर्मचाऱ्यांनी प्लास्टिक पिशव्या गोळा करून हेलिकॉप्टर उतरविण्यासाठी अनुकूल करून दिले. तोपर्यंत हेलिकॉप्टर आकाशात घिरट्या मारत होते. काही वेळाने हेलिकॉप्टर सुरक्षितपणे उतरविण्यात आले. सदर घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हेलिपॅड निर्माण करताना खबरदारी न घेतल्याने हा प्रकार घडल्याचे दिसून आले आहे.









