130 शाळात कायमस्वरुपी शिक्षकांची वानवा : सारा भार अतिथी शिक्षकांवर : अतिथी शिक्षकांची भरती लवकरच
बेळगाव : काही दिवसांपूर्वीच शिक्षकांची बदली प्रक्रिया पार पडली. या बदलीमुळे बेळगाव जिल्ह्यातील 130 सरकारी प्राथमिक शाळांमध्ये शिक्षक नाहीत. शिक्षकांनी इतर ठिकाणी बदल्या करून घेतल्याने या शाळांमध्ये एकही कायमस्वरुपी शिक्षक नसल्याचे धक्कादायक सत्य समोर आले आहे. यामध्ये खानापूर तालुक्यातील सर्वाधिक शाळांचा समावेश असून विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात सापडत आहे. मागील वर्षभरापासून रखडलेल्या बदली प्रक्रियेला जुलै महिन्यात प्रारंभ झाला. बऱ्याच शिक्षकांनी ग्रामीण भागातून शहरी भागात बदल्या करून घेतल्या. शिक्षकांनी आपल्या पसंतीच्या गावांमध्ये बस्तान हलविल्याने दुर्गम भागातील शाळांमध्ये मात्र शिक्षकांची कमतरता जाणवली. अनेकांनी तर जिल्ह्याबाहेर बदल्या करून घेतल्या आहेत. काही शाळांमध्ये दोन ते तीन शिक्षक कार्यरत होते, त्या शाळांतील सर्व शिक्षकांनी इतरत्र बदल्या करून घेतल्याने शाळांचा कारभार अतिथी शिक्षकांच्या हाती आहे. काही शिक्षक मागील वर्षभरात निवृत्त झाले असून त्यांच्या जागी अद्याप नवीन शिक्षकांची नेमणूक करण्यात आलेली नाही. उच्च प्राथमिक शाळांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली. परंतु, प्राथमिक शाळांसाठी अद्याप भरती प्रक्रिया पार पडलेली नाही. या शाळांमध्ये कुणी जाण्यासही इच्छुक नसल्याने विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधकारमय होत आहे.
खानापूर तालुक्याला सर्वाधिक फटका
खानापूर तालुका हा दुर्गम तालुका असल्यामुळे अनेक गावांमध्ये वाहतुकीच्या सेवा उपलब्ध नाहीत. तसेच शाळांमध्ये सर्व सोयीसुविधा उपलब्ध नसल्याने शिक्षक दुर्गम भागातील शाळांमध्ये जाण्यास इच्छुक नसतात. खानापूर तालुक्यातील 30 शाळांमध्ये एकही कायमस्वरुपी शिक्षक नसल्याचे उघडकीस आले आहे. या शाळांमधील शिक्षकांनी इतरत्र बदल्या करून घेतल्याने तात्पुरत्या स्वरुपात नेमण्यात आलेल्या अतिथी शिक्षकांवर शाळांचा डोलारा उभा आहे. ज्या शाळांमध्ये अतिरिक्त शिक्षक आहेत, त्यांना रिक्त जागांवर नेमणुका दिल्या जाणार आहेत. दुर्गम भागातील शाळांसाठी अतिथी शिक्षकांची नेमणूक शिक्षण विभागाकडून केली जात असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. खानापूर तालुक्याला सर्वाधिक फटका बसला असून या तालुक्यामध्ये अतिथी शिक्षकांची भरती लवकरच केली जाण्याची शक्यता आहे.









