डॉ. माणिकराव साळुंखे यांचे प्रतिपादन : जीएसएस कॉलेजमध्ये एसकेईचा स्थापना दिन उत्साहात
बेळगाव : पूर्वीची शिक्षणपद्धती व सध्याची शिक्षणपद्धती यामधील दुवा तुटलेला जाणवतो. हा दुवा जोडण्याचे काम नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण करीत आहे. यासाठी नवनवीन कौशल्ये महाविद्यालयांतून शिकविली पाहिजेत. विज्ञानवादी ज्ञानाची चर्चा बंद झाल्यामुळे वैज्ञानिक दृष्टिकोन मागे पडला. आता 21 व्या शतकात हा दृष्टिकोन सुरू झाला असून विज्ञानवाद देशाला सर्वोच्च शिखरावर पोहोचवेल, असे विचार पुणे येथील भारती अभिमत विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. माणिकराव साळुंखे यांनी व्यक्त केले. एसकेई सोसायटीचा स्थापना दिन सोमवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात डॉ. साळुंखे बोलत होते. व्यासपीठावर संस्थेचे चेअरमन किरण ठाकुर, सावंतवाडी येथील राणी पार्वतीदेवी यांचे नातू खेमराज सावंत-भोसले, अध्यक्ष विनायक आजगावकर, सचिव मधुकर सामंत, राज देशपांडे, व्हाईस चेअरमन एस. वाय. प्रभू, अशोक शानभाग उपस्थित होते.
डॉ. साळुंखे म्हणाले, एसकेई संस्थेने भारतातील शैक्षणिक क्षेत्रात अत्यंत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. या संस्थेचे विद्यार्थी आज देश-विदेशात सर्वोच्च पदांवर कार्यरत आहेत. एक ध्यास घेऊन सुरू झालेली ही संस्था आज अनेक विद्याशाखांमधून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत असल्याचे त्यांनी सांगितले. संस्थेचे चेअरमन किरण ठाकुर म्हणाले, महाविद्यालये ही सामाजिक, शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक चळवळीची केंद्रे बनली पाहिजेत. यासाठी शिक्षकांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. एसकेईचे विद्यार्थी देश तसेच राज्यातील अनेक समाजोपयोगी चळवळींमध्ये सहभागी झाले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मिळालेल्या संधीचा वापर करून उत्तम ज्ञान व कौशल्य आत्मसात करावे, असा सल्ला त्यांनी दिला. खेमराज सावंत-भोसले यांनी स्त्राr शिक्षणाचे महत्त्व सांगून राणी पार्वतीदेवी यांच्या कार्याची माहिती दिली. प्रारंभी नुपूर रानडे हिने स्वागतगीत सादर केले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते राणी पार्वतीदेवी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्राचार्य डॉ. अभय पाटील यांनी प्रास्ताविक केले. संस्थेच्या संचालिका माधुरी शानभाग यांनी संस्थेविषयी माहिती दिली. प्रा. प्रसन्न जोशी यांनी परिचय करून दिला. चेअरमन किरण ठाकुर यांनी स्वागत केले. सूत्रसंचालन डॉ. शर्मिला संभाजी व प्रा. शरयू पोतनीस यांनी केले. प्रा. सविनय शिमनगौडर यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला लता कित्तूर, श्रीनाथ देशपांडे, ज्ञानेश कलघटगी यासह संचालक मंडळ, प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.









