दुकानाला आग लावण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप
वृत्तसंस्था/ इम्फाळ
मणिपूरमध्ये तैनात असलेल्या केंद्रीय जलद कृती दलाच्या (आरएएफ) तीन जवानांना शनिवारी राज्य पोलिसांनी अटक केली. इफाळच्या न्यू चेकॉन भागात मांसाचे दुकान पेटवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप या जवानांवर आहे. आरएएफचे सोमदेव आर्य, कुलदीप सिंग आणि प्रदीप कुमार यांना तत्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आल्याची माहिती गृह मंत्रालयाने दिली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे तिघेही शुक्रवारी रात्री साधे कपडे घालून कारमध्ये बसून परिसरात आले होते. त्यांनी एका नागा आदिवासी व्यावसायिकाच्या मांसाच्या दुकानाला आग लावण्याचा प्रयत्न केला. स्थानिकांनी विरोध केल्यावर त्यांनी तेथून पळ काढला. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर पोलिसांनी तिघांनाही अटक केली.









