वृत्तसंस्था/ इंफाळ
मे महिन्याच्या सुरुवातीला दोन समुदायांमध्ये निर्माण झालेल्या तणावानंतर मणिपूरमध्ये हिंसाचार निर्माण झाला आहे. जवळपास तीन आठवड्यांपासून येथे तणाव असून गृहमंत्री अमित शहा 29 मे रोजी मणिपूरला भेट देणार आहेत. पुढील तीन दिवस ते राज्यात विविध बैठका घेऊन तणाव शांत करण्याचा प्रयत्न करणार आहेत. त्यांच्या या दौऱ्यापूर्वी लष्करप्रमुख मनोज पांडे कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी राज्यात दाखल झाले आहेत. राज्यात 3 मे पासून सुरू झालेल्या वांशिक हिंसाचारात आतापर्यंत 70 हून अधिक लोक मारले गेले आहेत. तसेच 200 जखमी झाले असून 40 हजारहून अधिक लोक विस्थापित झाले आहेत. राज्यात लष्कर आणि निमलष्करी दलांची मोठी उपस्थिती असून विशेषत: संवेदनशील भागात अतिरिक्त पोलीस दल तैनात करण्यात आले आहे.
गृहमंत्री अमित शहा सोमवारी सकाळी मणिपूरच्या दौऱ्यावर दाखल होणार आहेत. त्यांनी मैतेई आणि कुकी या दोन्ही समुदायांना शांतता राखण्याचे आणि सामान्य स्थिती आणण्यासाठी काम करण्याचे आवाहन केले. लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनीही शनिवारी सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राज्याचा दोन दिवसीय दौरा केला. इम्फाळ खोऱ्यात आणि आजूबाजूला राहणारे मैतेई लोक आणि टेकड्यांमध्ये राहणारी कुकी जमाती यांच्यात जातीय हिंसाचार सुरू आहे. अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गात मैतेई लोकांचा समावेश करण्याची मागणी होत आहे. यावरून कुकी समाजात हिंसक मारामारी झाली आहे.









