आसाम विधानसभा अध्यक्षांचा निर्णय : ब्रिटिश कालीन नियम बदलला
वृत्तसंस्था/गुवाहाटी
आसाम विधानसभेत शुक्रवारी नमाज पठण करण्यासाठी मिळणारा ब्रेक समाप्त करण्यात आला आहे. भारतात ब्रिटिश काळापासूनच आसाम विधानसभेत दर शुक्रवारी नमाज पठण करण्यासाठी दुपारी 12 वाजल्यापासून 2 वाजेपर्यंत ब्रेक दिला जात होता, यात मुस्लीम आमदार नमाज पठण करत होते. परंतु आता हा नियम बदलण्यात आला आहे.
आसाम विधानसभेचे अध्यक्ष विश्वजीत दैमारी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत सर्वसंमतीने हा ब्रेक संपुष्टात आणण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती भाजप आमदार विश्वजीत फुकन यांनी दिली आहे. लोकसभा, राज्यसभा किंवा देशाच्या कुठल्याही अन्य सभागृहात नमाजासाठी ब्रेक सारखी तरतूद नाही. याचमुळे आसाम विधानसभा अध्यक्षांनी ब्रिटिश काळातील ही परंपरा बदलण्याचा निर्णय घेतला आहे. आसाम विधानसभेचे कामकाज सोमवार ते गुरुवारपर्यंत सकाळी 9.30 वाजता सुरू व्हायचे. तर शुक्रवारी हे कामकाज सकाळी 9 वाजता सुरू केले जायचे, जेणेकरून दोन तासांचा नमाजाचा ब्रेक दिला जावा. परंतु आता ही प्रथा रद्द करण्यात आल्याचे फुकन यांनी नमूद केले आहे.
आसामच्या विधानसभेत कर्मचाऱ्यांना शुक्रवारी नमाजासाठी 2 तासांची सुटी देण्यात येत होती. या प्रथेची सुरुवात मुस्लीम लीगचे सैयद सादुल्ला यांनी 1937 मध्ये केली होती. परंतु आता पुढील काळात आसाम विधानसभेत नमाजासाठी कुठल्याही प्रकराचा ब्रेक मिळणार नाही.
आसामचे मुख्यमंत्री हेमंत विश्व शर्मा यांनी यासंबंधी एक ट्विट केला आहे. हा निर्णय घेतल्याप्रकरणी त्यांनी विधानसभा अध्यक्षांचे आभार मानले आहेत. या निर्णयामुळे आसाम विधानसभेने उत्पादकतेला प्राथमिकता दिली आहे आणि वसाहतकालीन ओझ्याचे आणखी एक चिन्ह हटविले असल्याचे शर्मा यांनी नमूद केले आहे.









