जागतिक मुत्रपिंड दिन कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. नितीन गंगाणे यांचे प्रतिपादन
बेळगाव ; प्रत्येकांनी मुत्रपिंडाचे आरोग्य सांभाळावे. कारण शरीरातील अवयवांमध्ये मुत्रपिंडही महत्त्वाचे आहे. त्याचे आरोग्य बिघडले तर जीवनभर त्रास भोगावा लागतो. त्यामुळे मुत्रपिंडाच्या आरोग्य विषयी सर्वसामान्य नागरिकांना जागृत करण्याचे काम सातत्याने केले पाहिजे, असे आवाहन केएलई अकादमी ऑफ हायर एज्युकेशन अॅण्ड रिसर्च सेंटर (काहेर) चे उपकुलगुरू डॉ. नितीन गंगाणे यांनी केले. डॉ. प्रभाकर कोरे इस्पितळ व वैद्यकीय संशोधन केंद्राच्या नेप्रॉलॉजी विभागाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या जागतिक मुत्रपिंड दिन कार्यक्रमाचे उद्घाटन करून ते बोलत होते. वैद्यकीय विज्ञान प्रगत झाले आहे. तरीही मुत्रपिंड खराब झाल्यास डायलेसीस करणे किंवा मुत्रपिंड रोपण करणे हे दोनच पर्याय आहेत. या विषयी जागृतीची गरज आहे. अति रक्तदाब, मधुमेह, मुत्रखडे होवू नये म्हणून खबरदारी घेण्याची गरज आहे, असेही डॉ. नितीन गंगाणे यांनी सांगितले. इस्पितळाचे वैद्यकीय संचालक डॉ. कर्नल एम. दयानंद म्हणाले, गेल्या 20 वर्षांत अत्याधुनिक उपचार मिळत आहेत. सर्वसामान्यांमध्ये मुत्रपिंडांच्या आरोग्यविषयी जागृती करण्याबरोबरच अत्याधुनिक उपचारासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. यावेळी काहेरचे कुलसचिव डॉ. व्ही. ए. कोठीवाले, डॉ. मिल्लकार्जुन करिशेट्टी (खानपेठ) आदींचीही भाषणे झाली. मुत्रपिंडाच्या आरोग्य जागृतीसाठी कोल्हापूर सर्कलपासून रॅली काढण्यात आली. डॉ. नितीन गंगाणे यांनी रॅलीला चालना दिली. कॅन्सर इस्पितळाचे वैद्यकीय संचालक डॉ. एम. व्ही. जाली, वैद्यकीय महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. राजेश पवार, डॉ. रितेश वेर्णेकर, डॉ. रवी सरवी, डॉ. एस. आय. निली, डॉ. एस. सी. मेटगुड, शकुंतला कोरे, अनिल इंगळे आदी उपस्थित होते. प्रमोद सुळीकेरी यांनी सूत्रसंचालन केले.









