कृष्णात डोणे महाराजांची भाकणूक : नणदी येथे हालसिद्धनाथांची यात्रा उत्साहात
वार्ताहर/एकसंबा
नणदी (ता. चिकोडी) येथे हालसिद्धनाथांच्या चैत्र यात्रेनिमित्त कृष्णात डोणे महाराज यांनी रविवारी 20 रोजी पहाटे विविध विषयांवर भाकणूक सांगितली. खासकरून पुण्य-पाप, महागाई, राजकारण, महामारी, तरुणपिढी वाममार्गाला लागंल, 18 तऱ्हेचे आजार माणसाला येतील, विशेषकरून माणसाचे जगणे मुश्कील होईल, बारा वर्षाचं बालपण, 24 वर्षाचं तरुणपण, 35 वर्षाचं म्हातारपण, तीन दिवस तीन रात्र अंधार पडंल, धर्माचा पाऊस कर्माचे पीक पडेल. मेघराजाची वाट बघत युद्धं होतील, रक्तपाट वाहतील. दुनिया पेटंल, काळरात्र होईल, असे कथन त्यांनी केले.
सालाबादप्रमाणे यंदाच्या वर्षीही चैत्र
पौर्णिमेनिमित्त होणारी यात्रा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. पहाटे मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. भाकणूक सांगताना डोणे महाराज म्हणाले, पोथीपुराण वाचून दाखवावे, क्रिया चालवत खोटे तू बोलशील तर मी खरे करेन, पेरंल ते उगवंल. मेघ उदंड हाय, बांधाआड बांध शिवाआड शिव हाय. मेघाची कावड गैरहंगामी उदंड पावंल, मेघाच्या पोटी आजार हाय, द्रोणागिरी डोंगरावर देव एका पायावर उभा आहे. तो दुनिया न्याहाळत हाय, त्याच्या मागेही अंधार हाय, पुढेही अंधार पडला हाय, नणदीकर सरकार घराणे क्षत्रिय हाय, नणदीकर घराण्याला माझा आशीर्वाद हाय, नणदी गावचा महिमा वाढत जाईल. धर्माची गादी हाय, धर्माच्या गादीला तुम्ही रामराम करा.
पाऊस दगा देईल
सरता मिरग निघता आडद्रा मध्यम फाट्याचा पेरा होईल. सरता आडद्रा निघता तारणा, अल्लम दुनियेचा होईल. कुरी धाऱ्याला बसंल, रोहिणीची पेरणी हादग्याची पुरवणी होईल. देवधान्य बहुत उदंड पिकंल, पाऊस, पिके यांचे कालमान बदलत जाईल. देवयान धान्य मध्यम पिकंल, राजयान धान्य उदंड पिकंल, खरीप उदंड पिकंल अन् मोलानं विकंल, जमिनीतील धान्य बहुत बेमान. तांबडी रास मध्यम पिकंल, कालयान धान्य सुफळ जाईल, पांढरे धान्य उदंड पिकंल, मोलानं विकंल. पारवे फुल सुफळ जाईल. घवाची पेंड मध्यम पिकंल मोलानं विकंल. हुकमी पाऊस दगा देईल, तापमानाचा पारा गगनाला जाईल, पाणी टंचाई भासल. दीड महिन्याच पीक येईल.
व्यापारी लोक शेतकऱ्यांना लुबाडतील
रसायन धान्य उदंड पिकंल, मोलानं विकंल. उसाला धारण, माणसाला मरण, उसाचा काऊस होईल. सडकेवर पडंल, शुगर फॅक्टरीचा मॅनेजर आनंदात राहील. साखरेचे भाव तेजी-मंदीत राहतील. चढंल उतरंल, गुळाचा भाव उच्चांक गाठंल, तेजीत राहील. उसाच्या कांड्याने व दुधाच्या भांड्याने राज्याराज्यात गोंधळ होईल. आंदोलन पेटंल, शेतकरीवर्ग चिंतेत राहील. उसाचा दर तीन हजार, साडेतीन हजार वरून चार हजारावर जाईल. साखर सम्राटांची खुर्ची डळमळीत राहील. तंबाखूची पेंढी मध्यम पिकंल, मोलानं विकंल. तंबाखुचा बंबाखू होईल. तंबाखुचा भाव गगनाला भिडेल. मांडवाच्या दारी 2000 म्हणतील 2000 ते 1800 होईल. 1800 म्हणता म्हणता 1500 चढंल उतरलं. व्यापारी लोक शेतकऱ्यांची लुबाडणूक करतील.









