मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे मत : चिकोडीत गोल्ल (यादव) हणबर समाजाचा शतकमहोत्सवी कार्यक्रम
चिकोडी : देशाला स्वातंत्र्य मिळाले असले तरी आजही सामाजिक, शैक्षणिक असमानता आहे. ही असमानता दूर करण्याचा प्रयत्न आमचे सरकार करीत असून, त्यासाठी आमचे सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिली. चिकोडी येथील आर. डी. महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित कर्नाटक राज्य गोल्ल (यादव) हणबर समाजाच्या शतकमहोत्सव आणि श्री. कृष्ण यादवानंद स्वामींच्या 16 व्या पट्टाभिषेक सोहळ्यात ते बोलत होते. मुख्यमंत्री सिद्धरामय्या पुढे म्हणाले, डॉ. बी. आर. आंबेडकर यांनी शिका, संघटित व्हा व संघर्ष करा असा मूलमंत्र दिला असून त्याकाळी गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी स्वाभिमानी जीवन जगण्यासाठी हा मंत्र उपयुक्त ठरला आहे. व तेव्हापासून दिन दलितांना स्वावलंबी जीवन जगणे शक्य झाले आहे. या पार्श्वभूमीवर समाजातील स्वामीजींनी याबाबत जनतेमध्ये जागृती करण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाले असले तरी आजही आर्थिक व शैक्षणिक असमानता आहे. सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक, राजकीय लोकशाही समानता मिळताच ही असमानता दूर होणे व सक्षम समाज निर्माण करणे शक्य असल्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सांगितले.
शिक्षण नसल्यास गुलामगिरीत वाढ
ते म्हणाले, शिक्षण घेतले नसल्यास गुलामगिरीत वाढ होते. स्वाभिमानी जीवन जगता येणे शक्य होणार नाही. आपण शिक्षण घेतल्यामुळेच मुख्यमंत्री पदावर आरुढ होणे शक्य झाले आहे. सर्वांमध्ये समानता असावी यासाठी संपत्तीचे वाटप करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. शोषित व अन्यायग्रस्त लोकांच्या विकासासाठी आपण पुढाकार घेतला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे शिका, संघटित व्हा व संघर्ष करा ही त्रिसूत्रे समाजाला देण्याच्या माध्यमातून सर्व समाजांना जागृत करण्यासाठी इतर समाजाने पुढे यावे असे आवाहन त्यांनी केले. मागासवर्गीयांनी समाजासाठी नियुक्त आयोगांनी दिलेले अहवाल वाचले पाहिजेत व जागृत होऊन संबंधित माहिती समजून घेऊन आपण गुलामगिरीतून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करावेत.
हणबर समाजासाठी विकास निगम
मनुस्मृतीच्या काळामध्ये काहींनाच शिक्षण व इतर अधिकार होते. गोरगरिबांना, दिन दलितांना गोल्ल व हणबर या सर्व समुदायांना याबाबतचा अधिकार नव्हता. राज्यात गोल्ल (यादव) हणबर समाजाच्या विकासासाठी स्वतंत्र विकास निगम करण्यात येईल असे सांगितले. यावेळी बोलताना सार्वजनिक बांधकाम खात्याचे व जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी चिकोडी ऐतिहासिक भूमी असून येथील जनता प्रबुद्ध आहे. डॉ. आंबेडकर यांनी भेट दिलेली ही भूमी असून या भूमीने देशाला अनेक जैन मुनी दिल्याची कीर्ती आहे. चिकोडी येथे झालेला गोल्ल समाजाचा हा मेळावा राज्यातील राजकीय, सामाजिक व शैक्षणिक, आर्थिक न्यायासाठी मोठा पथदीप ठरेल असे सांगितले. श्रीकृष्ण यादवानंद महास्वामी यांनी बोलताना गोल्ल (यादव) हणबर समाजासाठी स्वतंत्र विकास निगम रचना करण्यासोबत समाजाच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन केले. माजी आमदार पौर्णिमा श्रीनिवास म्हणाल्या समाजाच्या 28 उपजातीमध्ये 20 लाखाहून अधिक लोकसंख्या आहे. या समाजाला प्रत्येक जिल्हा व तालुका पातळीवर निवासस्थाने व समुदाय भवने निर्माण करण्यासाठी प्रत्येक जिल्हा केंद्राला 1 कोटी रुपये तर तालुका पातळीवर 50 लाख रुपये अनुदान द्यावे.









