वृत्तसंस्था/ इंडियन वेल्स
एटीपी टूरवरील येथे सुरु असलेल्या बीएनपी पेरीबस खुल्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत सर्बियाच्या टॉप सिडेड नोव्हॅक जोकोविचने एकेरीत शानदार विजय मिळवून तब्बल 5 वर्षांनंतर शानदार पुनरागमन केले.
एकेरीच्या शनिवारी झालेल्या सामन्यात जोकोविचने वुकिकचा 6-2, 5-7, 6-3 अशा सेट्समध्ये पराभव करत विजयी सलामी दिली. जोकोविचने आपल्या वैयक्तिक टेनिस कारकिर्दीत आतापर्यंत 24 ग्रँडस्लॅम स्पर्धेतील एकेरीची अजिंक्यपदे मिळविली असून त्याने स्पेनच्या राफेल नदालच्या विक्रमाशी बरोबरी साधली आहे. एटीपी मास्टर्स 1000 दर्जाच्या टेनिस स्पर्धांमध्ये जोकोविचने आतापर्यंत 400 सामने जिंकून नदालच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. जोकोविचने आतापर्यंत पाच वेळेला इंडियन वेल्स स्पर्धा जिंकली आहे. पण मध्यंतरी 2019 पासून जोकोविच या स्पर्धेत खेळू शकला नव्हता.
महिलांच्या विभागात अमेरिकेचे कोको गॉफ आणि आर्यना साबालेंका यांनीही पहिल्या फेरीतील सामने जिंकून विजयी सलामी दिली. महिला एकेरीच्या पहिल्या फेरीतील सामन्यात गॉफने क्लेरा ब्यूरेलचा 2-6, 6-3, 7-6 (7-4) असा पराभव केला. अमेरिकेच्या कोको गॉफने आपल्या देशाच्या स्टिरेन्सचा 6-7 (2-7), 6-2, 7-6 (8-6) असा पराभव केला. या विजयामुळे गॉफने पुढील फेरी गाठली असून तिची लढत लुसीया ब्रोझेंटी बरोबर होणार आहे. ब्रोझेंटीने कॅलिनीनाचा 6-3, 6-4 असा पराभव केला. या स्पर्धेत पेगुलाला मात्र दुसऱ्याच फेरीत हार पत्करावी लागली. रशियाच्या बिनकोव्हाने पेगुलाचा 6-2, 3-6, 6-3 तसेच जपानच्या नाओमी ओसाकाने रशियाच्या सॅमसोनोव्हाचा 7-5, 6-3 असा पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळविले.









