वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सध्या येथे सुरू असलेल्या विश्व चषक पॅरा नेमबाजी स्पर्धेत भारताची मोना अगरवाल आणि आदित्य गिरी यांनी मिश्र सांघिक एअर रायफल स्टँडींग (एसएच 1) प्रकारात रौप्यपदक पटकाविले. यजमान भारताला या स्पर्धेतील हा दिवस खूपच यशस्वी ठरला. भारतीय नेमबाजांनी 2 रौप्य आणि 2 कांस्यपदकांची कमाई केली आहे.
मिश्र सांघिक 10 मी. एअर पिस्तुल नेमबाजी प्रकारातील सुवर्णपदकासाठीच्या लढतीत चीनच्या ली मीन आणि यांग चाओ यांनी भारताच्या मनिष नरवाल आणि रुबिना फ्रान्सीस यांचा 16-12 असा पराभव केला. त्यामुळे मनिष आणि रुबिना यांना रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. त्याचप्रमाणे याच क्रीडा प्रकारामध्ये भारताच्या भक्ती शर्मा आणि रुद्रांक्ष खंडेलवाल यांनी क्यूबाच्या सुवारेझ आणि रॉड्रिग्ज यांचा 16-8 असा पराभव करत कांस्यपदक मिळविले. भारताच्या मोना अगरवालने यापूर्वी या स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेसाठी आपले तिकीट आरक्षित केले. मोना अगरवाल आणि आदित्य गिरी यांनी मिश्र सांघिक एअर रायफल नेमबाजीत रौप्यपदक मिळविले. या क्रीडा प्रकारातील सुवर्णपदकाच्या लढतीत चीनच्या झाँग यिक्सिन आणि चाओ यांनी मोना आणि आदित्य यांचा 16-4 असा पराभव करत सुवर्णपदक हस्तगत केले. मिश्र सांघिक 10 मी. एअर रायफल नेमबाजी एसएचटू प्रकारात भारताच्या पवनी भानोत आणि सत्या रायना यांनी न्यूझीलंडच्या ब्रुंझेल आणि किरणजीत सिंग यांचा 17-15 असा पराभव करुन कांस्यपदक मिळविले. या क्रीडा प्रकारात ब्राझीलच्या जेसिका मिचेलॅक आणि किफेर यांनी सुवर्णपदक हस्तगत केले.









