डॉ. सिद्धराम महास्वामींचे प्रतिपादन : सरस्वती वानालयात पुरस्कार वितरण : सत्कार सोहळ्यानंतर गायनाचीही मैफल

बेळगाव : सद्वर्तन करणे म्हणजे स्वर्गलोक व अनाचार म्हणजे नरक होय. माणसाने आपले सद्वर्तन कधीही सोडू नये. आपले सद्वर्तन करीत राहावे. परंतु ते मी केले असे सांगू नये. असे केल्यास गर्व निर्माण होऊन लवकरच त्याचे पतनही होते, असे विचार गदग डंबळ मठाचे तोंटद डॉ. सिद्धराम महास्वामी यांनी व्यक्त केले. सरस्वती वाचनालयाच्या संगीत कला मंचद्वारे आयोजित संगीत संमेलनात त्यांना बेळगाव भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यावेळी त्यांनी हे विचार व्यक्त केले. वाचनालये समाजामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. वाचनालयातील पुस्तकांचे संगणकीकरण करणे आवश्यक आहे. यासाठी आपण सहकार्य करू, असे सांगून मनपूर्वक वाचन केल्यास दोन ओळींमध्ये दडलेला अर्थही आपल्याला कळतो, असे ते म्हणाले. प्रमुख पाहुणे डॉ. बसवराज जगजंपी यांनी आपल्या भाषणात नागनूर मठाचा इतिहास कथन केला. डॉ. सिद्धराम महास्वामी यांनी लोकाग्रहास्तव गदग येथील मठाचा पदभार स्वीकारला. त्यांनी बेळगावमध्येही भरीव काम केले आहे. शिवबसव स्वामींचा वारसा सिद्धराम महास्वामी यशस्वीपणे पुढे चालवत आहेत, असे ते म्हणाले. वाचनालयातर्फे दिला जाणारा हा 13 वा बेळगाव भूषण पुरस्कार आहे. डॉ. सिद्धराम स्वामी यांच्या पद्स्पर्शाने वाचनालय पुनीत झाले आहे, असे अध्यक्षा स्वरूपा इनामदार यांनी प्रास्ताविकात सांगितले. सत्कार सोहळ्यानंतर हुबळीचे रविंद्र जकाती यांचे व मुंबईचे राजाराम आंबर्डेकर यांचे गायन झाले.
रविंद्र जकाती यांनी यमन रागामध्ये विलंबित एकतालात ख्याल सादर केला. जलद एकतालामध्ये त्यांनी गायलेली बंदिश आकर्षक होती. त्यानंतर कुमारांनी गायलेले ‘कौनो ठगवा नगरिया लुटल हो’ हे कबिरपद सादर केले. त्यांनी ‘पिया जी म्हारे नैना’ हे मीरा भजन गाऊन सांगता केली. त्यांना तबल्यावर विशाल मोडक आणि संवादिनीवर योगेश रामदास यांनी संगत केली. तानपुऱ्यावर पूजा चव्हाण-पाटील आणि महाबळेश्वर साबण्णावर यांनी साथ दिली. शेवटचे पुष्प मुंबईचे राजाराम आंबर्डेकर यांनी गुंफले. राग सरस्वतीमध्ये रूपक तालात त्यांनी गायलेली बंदिश आकर्षक होती. भीमसेनजींचे प्रसिद्ध ‘जो भजे हरी को सदा’ हे पद गाऊन त्यांनी आपल्या कार्यक्रमाची आणि पर्यायाने संमेलनाची यशस्वी सांगता केली. त्यांना गायन साथ रूपेंद्र परब यांनी केली. सूत्रसंचालन करणाऱ्या समीरा मोडक आणि वृंदा जोशी यांचाही स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. वाचनालयाचा कर्मचारीवर्ग आणि ध्वनी संयोजक श्रीकांत प्रभू यांनाही सन्मानित करण्यात आले.









