क्षीरभाग्य योजनेंतर्गत दूधपावडरचा पुरवठा : सहा महिन्यांपासून पुरवठाच बंदमुळे कुपोषणाची भीती

बेळगाव : गर्भवती आणि बाळ-बाळंतिणींना पौष्टिक आहार मिळावा म्हणून देण्यात येणारा दूधपावडरचा पुरवठा बंद झाला आहे. त्यामुळे अंगणवाडीतील बालके, गर्भवती आणि बाळंतिणींच्या सुदृढ आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. शिवाय बालकांमध्ये पुन्हा कुपोषणाची भीती व्यक्त होऊ लागली आहे. मागील सहा महिन्यांपासून या दूधपावडरचा पुरवठा बंद झाल्याने अडचणी वाढल्या आहेत. अंगणवाडीतील बालकांचे कुपोषण कमी व्हावे, यासाठी क्षीरभाग्य योजनेंतर्गत दूधपावडरचा पुरवठा केला जात होता. मात्र, मागील काही दिवसांपासून हा पुरवठा थांबला आहे. त्यामुळे सकस आहारापासून दूर राहावे लागले आहे. 0 ते 3 आणि 3 ते 6 वर्षे वयोगटातील बालकांना 20 ग्रॅम मलईयुक्त दूध दिले जात होते. आठवड्यातून पाच दिवस बालकांना हे दूध उपलब्ध होत होते. मात्र, आता केएमएफकडून दुधाचा पुरवठा कमी होत असल्याचे कारण पुढे करून हा पुरवठा बंद झाला आहे. त्यामुळे महिला व बालकल्याण खात्याच्या अडचणी वाढल्या आहेत. गर्भवती महिलांना दैनंदिन सकस आहार वितरित केला जातो. त्याचबरोबर दूधपावडर देण्याची योजनाही राबविण्यात आली होती. मात्र, काही दिवसातच ही योजना बारगळली. त्यामुळे महिलांना दूधपावडरपासून आता वंचित राहावे लागत आहे.जिल्ह्यातील 5 हजार 331 अंगणवाड्यांपैकी सध्या एकाही अंगणवाडीला दूधपावडरचा पुरवठा केला जात नाही. आधीच कुपोषित बालकांची संख्या वाढू लागली आहे. त्यातच दूधपावडरचा पुरवठा बंद झाल्याने चिंता व्यक्त होत आहे. जिल्ह्यात 4 लाख 10 हजार 648 बालके, 48 हजार 931 गर्भवती महिला आणि 47 हजार 889 बाळंतीण महिलांची संख्या आहे. या सर्वांना आता दूधपावडरपासून वंचित राहावे लागत आहे. जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्यांना दरमहा 3 लाख किलो दूधपावडरचा पुरवठा केला जात होता. मात्र, ऑक्टोबरपासून कर्नाटक दूध महामंडळाने हा पुरवठा बंद केला आहे. त्यामुळे परिस्थिती गंभीर बनली आहे.
समस्या दूर होणार : श्रीनिवास
जिल्ह्याला पुरेल इतका दूधपावडरचा साठा नाही. मध्यंतरी दूधपावडरची टंचाई जाणवत होती. त्यावेळी बेंगळूर आणि म्हैसूर येथून दूधपावडर मागवण्यात आली होती. दुधाचा साठा कमी झाल्याने समस्या निर्माण झाली आहे. येत्या काही दिवसात मागणीनुसार दर आठवड्याला पुरवठा केला जाईल.
व्यवस्थापकीय संचालक केएमएफ, बेळगाव पुरवठा लवकरच : ए. एम. बसवराजू,
कर्नाटक दूध महामंडळाकडून मलईयुक्त दूधपावडरचा पुरवठा बंद झाला आहे. याबाबत शासनाला माहिती देण्यात आली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार दूधपावडरचा पुरवठा केला जाणार आहे.









