कवी अरुण म्हात्रे यांचे मत : सार्वजनिक वाचनालय आयोजित बॅ. नाथ पै व्याख्यानमालेत गुंफले दुसरे पुष्प
प्रतिनिधी / बेळगाव
कवितांमध्ये रस असणारे शिक्षक मिळाले की नाविन्यपूर्ण कविता निर्माण होतात. कवितांच्या सादरीकरणाला महत्त्व असून ती भावार्थानुसार सादर झाली पाहिजे. कवीने साकारलेल्या कल्पना आणि वास्तव कवितेतून सामोरे येते. कवितेच्या माध्यमातून तो एखाद्या गोष्टीबद्दल रस निर्माण करतो, असे विचार कवी अरुण म्हात्रे यांनी व्यक्त केले.
सार्वजनिक वाचनालय आयोजित बॅ. नाथ पै व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प गुंफताना त्यांनी हे मत व्यक्त केले. रेल्वे ओव्हरब्रिज येथील मराठा मंदिरमध्ये हे व्याख्यान झाले. प्रारंभी वाचनालयाचे अध्यक्ष गोविंद राऊत यांनी स्वागत केले. नेताजी जाधव यांनी प्रास्ताविक केले.
अरुण म्हात्रे म्हणाले, पाठ्यापुस्तकांतील कविता लहानपणीच बालमनावर प्रभाव टाकतात. त्यामुळे बाल वयातच विद्यार्थ्यांना कवितांचे वेड लागते आणि त्यातून एखादा चांगला कवी घडतो. लहानपणी ‘देवा तुझे किती सुंदर आकाश, सुंदर प्रकाश सूर्य देतो’ हे गाणे गुणगुणणारा विद्यार्थी पुढे स्वत:च्या कल्पनेतून कविता करतो.
थोर कवींनी केवळ कविता केल्या नाहीत तर त्यांनी समाजाचे हित आणि प्रबोधनाचे कार्य कवितेच्या माध्यमातून केले आहे. लहानपणी मुलांच्या कानावर चांगल्या कविता पडाव्यात यासाठी त्या अभ्यासक्रमात समाविष्ट केल्या आहेत. ‘काळ्या मातीत मातीत, टिपण चालते’ हे शिवाराची महती सांगणारं गाणं शेतकऱ्यांच्या तोंडून नकळत गुणगुणलं जातं, तेव्हा शेत-शिवाराचे महत्त्व अधोरेखीत होते.
कवितेतील सादरीकरणही महत्त्वाचे
जोंधळ्याच्या पिकावर सोन्याचे दाणे दिसतात, ही कल्पना कवी कवितेच्या माध्यमातून साकारत असतो. यासाठी कवितेतील सादरीकरणही महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी कवी अरुण म्हात्रे यांनी कवी विं. दा. करंदीकर, बापट, नारायण सुर्वे आदींच्या कविता गाऊन त्यांची माहिती रसिकांना करून दिली. यावेळी रसिक श्रोते आणि वाचनालयाचे सदस्य उपस्थित होते. प्रसन्न हेरेकर यांनी आभार मानले.









