अध्याय सत्ताविसावा
पर्वणी, जयंतीच्या दिवशी करावयाच्या विशेष पूजेबद्दल सांगताना भगवंत म्हणाले, पर्वे किंवा इतर वार्षिक जयंती इत्यादि प्रसंगी देवाचे दात घासण्यापासून देवाची पूजा करण्यास प्रारंभ करावा. नंतर मूर्तीला पंचामृताचे स्नान घालावे व नाना प्रकारचे दागिने घालून तिच्या मनमोहक रूपाची छबी डोळ्यात साठवावी. नंतर षड्रस अन्नाचा नैवेद्य अर्पण करावा. नंतर हात धुण्यासाठी सुवासिक उदक, मुखशुद्धीसाठी तांबूल अर्पण करावा. भक्त श्रद्धेने पूजा करत असताना देव आपण देव आहोत हे विसरून ते भक्ताशी एकरूप होतात म्हणून तो देव आहे याची त्याला जाणीव व्हावी अशा भावनेने देवाला आरसा दाखवावा म्हणजे देवाधीदेवाला संतोष होतो. विशेष पर्वाच्या दिवशी किंवा जयंतीच्या दिवशी संत वैष्णवांना जमवून अत्यंत प्रेमाने रात्रंदिवस गीत, नृत्य, कीर्तन करावे. तसेच शास्त्रात सांगितल्याप्रमाणे दीक्षा घेऊन हवन केले असताही देव तत्काळ प्रसन्न होतो. अग्नीमध्ये माझे ध्यान करावे. ध्यान करताना ध्यानाच्या मूर्तीबद्दल पुढील विचार मनात आणावेत. माझी शांत मूर्ती तापलेल्या सोन्याप्रमाणे चमकत आहे. चार हातांमध्ये शंख, चक्र, गदा, पद्म शोभत आहेत. पीतांबर कमळातील केसराप्रमाणे शोभून दिसत आहे. मस्तकावर मुगुट, मनगटात कडी, कमरेला करदोटा आणि बाहूंमध्ये बाजूबंद झगमगत आहेत. वक्षस्थळावर श्रीवत्साचे चिन्ह आहे. गळ्यामध्ये कौस्तुभमणी झगमगत आहे. गळ्यात वनमाळा रूळत आहे. ह्याप्रमाणे अग्नीमध्ये यथासांग माझ्या ध्यानाची कल्पना करून, त्याचे आवाहन व पूजन करून विधीयुक्त होमाला आरंभ करावा व तो शास्त्रात सांगितल्याप्रमाणे पूर्ण करावा. अशा प्रकारे होमहवन पूर्ण झाल्यावर देवाच्या प्रतिमेची जिथे पूजा केली असेल तेथे येऊन ध्यानपूर्वक मूलमंत्राचे स्मरण करावे. पूज्य आणि पूजक यांहून भिन्न नसलेला असा परात्पर जो नारायण त्या परब्रह्माच्या ठिकाणी मन लावून स्वस्थ अंत:करणाने आसन घालावे. ध्यानात जोपर्यंत मन स्थिर राहील, तोपर्यंत आसन स्थिर ठेवावे. ह्याप्रमाणे ध्यानाचे विसर्जन झाले म्हणजे देवाचे भोजन झाले अशी भावना करून त्याला शुद्ध आचमन अर्पण करावे. अग्नीतील मूर्तीध्यान व आपण पूजलेली प्रतिमा या दोहो ठिकाणीही यथोक्तरीतीने शुद्ध आचमन समर्पावे. देवाच्या नैवेद्यातील अवशिष्ट भाग विष्वक्सेनाला द्यावा आणि नंतर उष्टं काढून देवांना हात धुवायला पाणी द्यावे. कापरात घोळलेल्या सुपारीच्या फोडी, पिकलेल्या पानाचा विडा, सुवासिक केलेला कात, अशा प्रकारचा उत्कृष्ट तांबूल रुची येण्यासाठी द्यावा. वेलची, लवंगा, कंकोळ, थोडेसे जायफळ अशा पदार्थांनी युक्त असलेल्या तांबूलाने देवाचे तोंड अतिशय रंगून ते फारच शोभायमान दिसते. चोवा (चंदनापासून केलेला एक सुवासिक पदार्थ), कस्तूरी, बुक्का व पुष्पांजली अर्पण करावी. यापुढे देव लवकर कसा प्रसन्न होईल ते भगवंत सांगत आहेत. ते म्हणतात, माझ्या लीलांचे गायन करावे, त्यांचे वर्णन करावे आणि माझ्या लीलांचा अभिनय करावा. हे सर्व करताना प्रेमोन्मत्त होऊन नाचावे. माझ्या कथा स्वत: ऐकाव्यात, दुसऱ्यांना ऐकवाव्यात आणि हे करताना प्रपंचाला काही वेळापुरते तरी विसरून जावे. ज्ञान, ध्यान, उपासना ही सारी गौण होत. देव हा भावाचा भोक्ता. देव हा भावानेच भेटतो. मन ध्यानातून निसटले तर माझे नामस्मरण करावे किंवा आदरपूर्वक माझ्या गुणांचे श्रवण करावे. हरिगुणांचे किंवा हरीच्या यशाचे श्रवण केले असता अंत:करणाला सुख होते. त्या सुखाने सुखभरित होऊन आपण स्वत:च हरिकीर्तन करावे. कीर्तनात श्रोत्यांना माझ्या कथा ऐकवाव्यात. त्यात माझ्या लीलांचा समावेश असावा त्यांचे वर्णन करताना मी माझ्या भक्तांच्यावर आलेल्या संकटात त्यांचा तारणहार कसा होतो ते सविस्तर सांगावे. हे सर्व ऐकून माझ्यावरचा श्रोत्यांचा विश्वास अधिक कसा वाढेल यावर जोर ठेवावा. अशा प्रकारे माझे कीर्तन करणारा माझा भक्त माझा अत्यंत लाडका होतो.
क्रमश:








