10 नक्षलवाद्यांना अटक : मोठ्या हल्ल्याचा होता कट
वृत्तसंस्था/ हैदराबाद
छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर जवानांनी 10 नक्षलवाद्यांना अटक केली आहे. या नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात स्फोटके हस्तगत करण्यात आली आहेत. ही स्फोटके नक्षलवादी संघटनांच्या म्होरक्यांमध्ये नेली जात होती असे सांगण्यात येत आहे. या स्फोटकांद्वारे छत्तीसगड किंवा तेलंगणात हल्ला घडवून आणण्याचा कट होता. अटक करण्यात आलेल्या नक्षलींपैकी 5 जण बिजापूरचे रहिवासी आहेत. सीमावर्ती भागातील ही कारवाई तेलंगणाच्या भद्रादी कोत्तागुडम पोलिसांनी केली आहे.
नक्षलवादी मोठ्या प्रमाणात स्फोटके घेऊन मुलाकानापल्ली आणि दुमुगुडेम येथे लपून असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. याच्या आधारावर पोलिसांनी सीआरपीएफच्या मदतीने जंगलात शोधमोहीम राबविली. या शोधमोहिमेदरम्यान 10 संशयितांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर मोठ्या प्रमाणात स्फोटके हस्तगत करण्यात आली आहेत.
500 डेटोनेटर हस्तगत
हस्तगत सामग्रीत एक ट्रॅक्टर, बोलेरो वाहनासमवेत दोन दुचाकींचा समावेश आहे. या वाहनांच्या तपासणीदरम्यान ही स्फोटके मिळाली आहेत. यात 500 डेटोनेटरसमवेत अन्य स्फोटक सामग्रीचा समावेश आहे. ही स्फोटके नक्षलवादी म्होरक्यांकडे पोहोचविली जात होती असे आरोपींनी चौकशीदरम्यान सांगितले आहे.









