सहा दुकाने, एका लाकडाच्या वखारीचे नुकसान, अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न, पोलीस निरीक्षकांसह सहकारी पहाटेपर्यंत घटनास्थळी
प्रतिनिधी /बेळगाव
शनिवारी रात्री उशिरा जुना धारवाड रोडवरील दुकानांना लागलेल्या आगीत सव्वा कोटी रुपयांहून अधिक आर्थिक हानी झाल्याची फिर्याद दाखल करण्यात आली आहे. या आगीत सुमारे सहा दुकाने आणि लाकडाच्या वखारीतील मशिनरीची मोठी हानी झाली आहे.
आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांना शर्थीचे प्रयत्न करावे लागले आहेत. पहाटे 3.30 पर्यंत पाण्याचे फवारे मारून आग आटोक्यात आणण्यात आली आहे. यासाठी अग्निशमन दलाची तब्बल 12 वाहने कार्यरत होती. व्ही. एस. टक्केकर यांच्या नेतृत्वाखालील अग्निशमन विभागाच्या पथकाने शर्थीचे प्रयत्न केले आहेत.
चेतना बॅटरी, साजिद ऑईल शॉप, अल्ताफ टायर शॉप, मारुती टायर शॉप, शौकत टायर व लाकूड वखारीसह एकूण सात आस्थापनांना आगीचा फटका बसला आहे. मार्केटचे पोलीस निरीक्षक मल्लिकार्जुन तुळसीगेरी व त्यांचे सहकारी पहाटेपर्यंत घटनास्थळी तळ ठोकून होते. ही आग नेमकी कशी लागली? याची चौकशी करण्यात येत आहे.
किमती मशिनरीही आगीच्या भक्ष्यस्थानी
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आगीत एकूण सुमारे सव्वा कोटी रुपयांची हानी झाल्याचे संबंधितांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. लाकूड वखारीतील किमती मशिनरीही आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहे. रात्री घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमली होती. टायरची दुकानेच अधिक असल्यामुळे आग लवकर आटोक्यात आली नाही.









