पर्यटकांचा ओघ वाढला : शैक्षणिक सहलीही दाखल, उत्पन्नात वाढ
प्रतिनिधी /बेळगाव
शहरापासून अगदी जवळ असलेल्या भुतरामहट्टी प्राणीसंग्रहालयात पर्यटकांसाठी सुरू करण्यात आलेल्या मिनी टायगर सफारीला पर्यटकांचा प्रतिसाद वाढला आहे. शनिवारी व रविवारी सुटीच्या दिवशी आणि शैक्षणिक सहलींमुळे प्राणीसंग्रहालय फुलत आहे. त्यामुळे भुतरामहट्टीत मिनी टायगर सफारीचे आकर्षण दिसून येत आहे.
म्हैसूर प्राणीसंग्रहालयाच्या धर्तीवर भुतरामहट्टी प्राणीसंग्रहालयाचा विकास साधला जात आहे. या प्राणीसंग्रहालयात वाघ, सिंह, बिबटे, कोल्हे, हरिण, चितळ, सांबर, तरस, जंगली कुत्रे यासह विविध पक्षी दाखल झाले आहेत. याबरोबरच परिसरात मत्स्यालय सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे पर्यटकांचा ओघ वाढला आहे. वन्यप्राणी जवळून पाहता येत असल्याने बालचमूसह कुटुंबेही दाखल होत आहेत. शिवाय शैक्षणिक सहलींना प्रारंभ झाल्याने सर्रास लहान वर्गातील मुलांच्या सहलीचे नियोजनही भुतरामहट्टी प्राणीसंग्रहालयात केले जात आहे. त्यामुळे ओघ वाढला आहे. मागील दोन वर्षांत कोरोनामुळे संग्रहालय बंद ठेवण्यात आले होते. मात्र, कोरोना संकटानंतर खुल्या करण्यात आलेल्या संग्रहालयात पर्यटकांची वर्दळ वाढू लागली आहे.
पर्यटकांना टायगर सफारीचा आनंद लुटता यावा, यासाठी प्राणीसंग्रहालयात मिनी टायगर सफारी सुरू करण्यात आली आहे. यासाठी वाहनाची व्यवस्था करून पर्यटकांना सफर घडविण्यात येत आहे. त्यामुळे वाघाला अगदी जवळून पाहता येते. यामुळे बालचमूचा आनंद द्विगुणित होत आहे. विशेषत: बेळगाव, चंदगड, गोवा, कोल्हापूर आणि कोकणातूनदेखील पर्यटक दाखल होऊ लागले आहेत. महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा लागून असल्याने नागरिकांची संख्या वाढू लागली आहे. जवळ कोणतेच प्राणीसंग्रहालय नसल्याने भुतरामहट्टी प्राणीसंग्रहालयात पर्यटकांचा ओघ वाढू लागला आहे. त्यामुळे साहजिकच उत्पन्नातदेखील वाढ होऊ लागली आहे. दैनंदिन 20 ते 25 हजार रुपये असणारे उत्पन्न आता 30 ते 40 हजार रुपयांवर गेले आहे. त्यामुळे प्राणीसंग्रहालय व्यवस्थापनदेखील समाधानी आहे.
39 हेक्टर परिसरात हे संग्रहालय पसरले आहे. विशेषत: मोठ्या वन्यप्राण्यांसाठी निवास कोठडी व इतर सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. शिवाय बाहेर पाणी व निवाऱ्याची सोय केली आहे. याबरोबरच पर्यटकांना प्राण्यांजवळ जाण्यासाठी मार्ग तयार करण्यात आला आहे. त्यामुळे वन्यप्राणी जवळून पाहणे सोयिस्कर होत आहे. अगदी बेळगाव शहराजवळच प्राणीसंग्रहालय झाल्याने शहर व ग्रामीण भागातील बालचमूंचा ओढा वाढला आहे.
प्राणीसंग्रहालय मंगळवार वगळता इतर दिवशी सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत खुले ठेवण्यात येत आहे. प्रौढांना 40 तर पाच वर्षांखालील मुलांना 20 रु. प्रवेश शुल्क आकारण्यात येत आहे. शिवाय टायगर सफारी व मत्स्यालयासाठी देखील स्वतंत्र प्रवेश शुल्क आकारले जात आहे.
शैक्षणिक सहली दाखल
डिसेंबरदरम्यान शैक्षणिक सहलींचे नियोजन केले जाते. विशेषत: लहान वर्गातील मुलांच्या सहली जवळच्या ठिकाणीच जातात. दरम्यान, शैक्षणिक सहलींसाठी भुतरामहट्टी प्राणीसंग्रहालयाचीच निवड केली जात आहे. त्यामुळे बालचमूंची संख्याही वाढत आहे. शिवाय प्राणीसंग्रहालय व्यवस्थापनाने शालेय विद्यार्थ्यांसाठी प्रवेश शुल्कात 25 टक्के सवलत दिली आहे.
संग्रहालयाच्या महसुलात वाढ
टायगर सफारीला पर्यटकांचा प्रतिसाद वाढला आहे. शैक्षणिक सहलीदेखील दाखल होऊ लागल्या आहेत. त्यामुळे संग्रहालयाचा महसूल वाढत आहे. मात्र, मोठ्या प्राण्यांच्या मांसासाठी अधिक खर्च येतो. शिवाय संग्रहालयात विकासकामे सुरू आहेत.
– के. एन. वेण्णूर (आरएफओ भुतरामहट्टी प्राणीसंग्रहालय)









