छताच्या दुरुस्तीचे काम अखेर बिम्स प्रशासनाकडून
बेळगाव : डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोडवरील जिल्हा रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावरील स्लॅबच्या छताच्या दुरुस्तीचे काम अखेर बिम्स प्रशासनाने हाती घेतले आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून दुरुस्तीचे प्रतिक्षेत असलेल्या धोकादायक छताच्या दुरुस्तीचा मार्ग मोकळा झाला आहे. जिल्हा रुग्णालयाची इमारत अत्यंत जुनी असून ती ठिकठिकाणी नादुरुस्त होण्यासह पावसाळ्यात पाणी झिरपते. अलीकडेच जुन्या इमारतीला हायटेक टच येण्यासाठी दुरुस्तीचे काम केले आहे. गळक्या स्लॅबवर लोखंडी पत्रे घालण्यात आले असून रंगरंगोटीही करण्यात आली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोडवरील जिल्हा रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरील स्लॅबचे छत ठिकठिकाणी कोसळले होते. मात्र त्यांच्या दुरुस्तीकडे काही वर्षांपासून दुर्लक्ष करण्यात आले होते.
पावसाळ्यापूर्वी दुरुस्ती करावी
स्लॅबचे छत कोसळल्याने त्यातील लोखंडी सळ्या दिसत होत्या. तसेच येथून ये जा करणाऱ्या रुग्ण व नातेवाईकांना आपला जीव मुठीत धरून ये जा करावे लागत होते. त्यामुळे धोकादायक छताची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी केली जात होती पण याकडे बिम्सने दुर्लक्ष केले होते. यापूर्वीदेखील अनेकवेळा दुरुस्ती करूनही पुन्हा छत कोसळत असल्याने ही समस्या कायम आहे. पावसाळ्यापूर्वी छताची दुरुस्ती करण्याचे काम बिम्सने हाती घेतले असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.









