हनुमान जयंतीच्या दिवशी भाजपचा वर्धापन दिन थाटामाटात साजरा झाला. भ्रष्टाचाराच्या दलदलीत विरोधक अडकले आहेत आणि दूरदूरपर्यंत पक्षाला कोणतेच आव्हान नाही असे सुचवले गेले. विरोधक म्हणजे भ्रष्टाचार आणि घराणेशाही. दिवाळे वाजलेले असले तरी बादशाही थाट. बडा घर आणि पोकळ वासा, असा प्रचार केला गेला. लोकसभा निवडणूक 12-13 महिन्यावर आलेली असताना राजकीय पटलावर भाजप ध्रुवताऱयाप्रमाणे अढळ आहे असा संदेश दिला गेला. राम नवमीच्या दिवशी मिरवणूका देशात बऱयाच ठिकाणाहून निघाल्या त्यात निवडणूकीचा रोग आडवा आला. बंगाल, बिहार, गुजरात आणि महाराष्ट्रातील काही ठिकाणी लहानमोठे दंगे झाले. त्यातून आरोप प्रत्यारोप सुरु झाले नसते तरच नवल होते.
बिहारच्या मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी यामागे भाजपच आहे असे सुचवले आणि हे कारस्थान आपण लवकरच उघड करू असे सांगितले. ममता बॅनर्जी यापेक्षा काही वेगळय़ा बोलल्या नाहीत. त्या दोन राज्यातील भाजपने पलटवार करत नितीश-तेजस्वी आणि दीदींना दोषी ठरवले. योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशात तर कमालच केली की जणू तिथे ‘हिंदू राष्ट्र’ अवतरले. एक सरकारी परिपत्रक काढून राज्यातील 75 जिह्यातील कलेक्टराना अखंड रामायण पाठ भरवून ‘अष्टमी’ आणि राम नवमी धुमधडाक्मयात साजरा करण्याचे आदेश दिले. हिंदुत्वाला धार देण्याचे राजकारण एकंदरच जोमात आले आहे. पाठय़पुस्तकांतून मोगल जवळजवळ तडीपार झाले. 2002च्या गुजरात दंगलीचे संदर्भ उडवले गेले. 1984च्या शीख विरोधी दंग्याचे विस्ताराने विवेचन झाले. नेहरूंना कात्री लागली. असे बरेच काही घडले.
इतिहासाचे पुनर्लेखन झाले तरी इतिहास बदलला जातो का? असा प्रश्न विचारला गेला. ‘हिंदू धोक्मयात’ ही आवई उठणे याचे एक कारण म्हणजे निवडणूका जवळ आलेल्या आहेत. वसंत ऋतू आला की कोकिळा गायला लागते तद्वतच निवडणुकीचे वारे पक्षांना आपापल्यापरीने बोलके करते. एकेक नाटय़मय घटना घडत असताना विरोधक दमात उखडले जातील अशी अपेक्षा धरलेल्या राज्यकर्त्यांना त्याच्याच भाषेत जबाब देणे सुरु झाले आहे. संसदेत काळे कपडे घालून सत्ताधारी पक्षाच्या नावाने शिमगा सुरु झाला आहे. संसदेच्या बजेट सत्राचा शेवटचा भागही संपला. तरी सरकार आणि विरोधक यातील संघर्ष तसूभरही कमी झालेला नाही. लोकसभा आणि राज्य सभेमध्ये केवळ 30 टक्के वेळेतच काम झाले आणि याचा सारा दोष विरोधकांनी सत्ताधाऱयांवर ठेवला. सरकारच्या एकेक कृत्याने आगीत तेल ओतण्याचे काम झाले. राहुल गांधी यांच्यावर यथेच्छ तोंडसुख घेतले गेले. त्यांनी प्रत्त्युत्तर देण्यासाठी कंबर कसली असताना त्यांची खासदारकी रद्द झाली. लोकसभा निवडणुकीत 2014 आणि 2019 मध्ये ‘आजा, बीजा, झाल्यावर आता पुढील वषी तिजा करायचा संकल्प सोडलेल्या भाजपला सध्या बराच माराचा सामना करावा लागत आहे.
सत्ताधारी म्हणजे एक नंबरचे कावेबाज प्रकरण असून ‘वाघ म्हटले तरी खातो, वाघोबा म्हटले तरी खातो’ असा प्रकार लक्षात आल्याने गर्भगळीत न होता विरोधी पक्षांनी प्रतिचढाई सुरु करून भाजपला हैराण करणे सुरु केले आहे. तेलंगणात मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी तेथील प्रदेश भाजप अध्यक्ष बांदी संजय कुमार यांना एसएससी परीक्षेतील पेपर फूटीप्रकरणात अटक करून एक नवीन खेळ सुरु केला. राव यांची मुलगी आणि माजी खासदार के कविता यांची दिल्लीतील दारू घोटाळा प्रकरणी ईडीने चौकशी सुरु केली आहे. खासदारकी रद्द होऊनदेखील राहुल गांधी हे सरकारला अडचणीत आणत आहेत.
अदानी घोटाळय़ातील नवीन प्रकाशात आलेला मुद्दा म्हणजे एका चीनी उद्योगपतीशी असलेली या समूहाची भागीदारी. देशातील सर्व बंदरे ज्या कंपनीच्या हवाले अदानी समूहाद्वारे केली जात आहेत ती चीनी कंपनी आहे असा आरोप करून राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिने हे भारताच्या कितपत हिताचे आहे असा सवाल राहुलनी केला आहे. पंतप्रधानांनी अदानी प्रकरणाबाबत अवाक्षर देखील अजून काढलेले नाही. याबाबत संसदेत चर्चा देखील घडू दिली गेलेली नाही. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मात्र केरळात काँग्रेस सत्तेत असताना तेथील एक प्रमुख बंदर अदानी यांना बिना टेंडरचे कसे बरे दिले गेले अशी पृच्छा केली आहे. काँग्रेस शासित राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये अदानी कसे बरे काम करत आहे असे विचारले आहे.
अदानी मुद्दा लवकर संपणार नाही आणि संयुक्त संसदीय समितीची मागणी सुरूच राहील असा याचा अर्थ दिसत आहे. चीनने अरुणाचल प्रदेशमधील काही भागांची नावे गेल्या आठवडय़ात बदलवून भारताला अजून एक धक्का दिला आहे. गेल्या दोन वर्षात असे तीनदा चीनने केले आहे. केंद्राने याविषयी जोरदार निषेध न नोंदवता बऱयाच सबुरीने काम घेतल्याने विदेशी मामल्यातील तज्ञमंडळी बुचकळय़ात पडली आहेत तर विरोधक टीका करू लागले आहेत. कायदा मंत्री किरण रिजूजू हे सर्वोच्च न्यायालयावर कडवट टीकाटिपण्णी करण्यात पटाईत आहेत पण अरुणाचलमधील खासदार असूनदेखील चीनच्या कारवायांबाबत मूग गिळून का गप्प आहेत असा त्यांना शालजोडीतील मारला जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणती डिग्री मिळाली आहे अशी विचारणा करत गुजरातमधील कोर्टाचा दरवाजा ठोठालेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे 25,000 रुपयांचा दंड झाला तरी खजील झालेले नाहीत त्यांनी तो मुद्दा सोडलेला नाही. ‘पंतप्रधान फारसे शिकलेले नसल्यानेच त्यांनी नोटबंदी सारखा घातक निर्णय घेतला’ असे सांगत नोटबंदीचा विषय परत चर्चेत आणण्याचा प्रयत्न चालवला आहे. गुलाम नबी आझाद यांनी ज्याप्रकारे राहुल गांधींवर टीका करणे परत सुरु केले आहे, त्याने काँग्रेसमधील कलह वाढवण्यासाठी आझाद यांनी भाजपची सुपारी कधीच घेतलेली होती असे दिसत आहे. काँग्रेसमध्ये असताना जी-23 हा असंतुष्ट मंडळींचा गट स्थापण्याची प्रेरणा त्यांना सत्ताधारी पक्षानेच दिली होती हे देखील जाणकारांना कळून येत आहे. ज्योतिरादित्य शिंदे यांच्यामार्फत राहुलवर तोफ डागून भाजप काँग्रेसला अस्वस्थ करत आहे. ए के अँटनी यांच्या मुलाला भाजपमध्ये घेऊन काँग्रेसला चिमटे काढले जात आहेत. काँग्रेसमधील सर्वात अनुभवी मुख्यमंत्री राजस्थानचे अशोक गेहलोत यांनी येत्या वर्षअखेर होणाऱया विधानसभा निवडणुकीकरता तयारी सुरु केली आहे. तिथे गॅस सिलेंडर 500 रुपयाचा मिळायला लागला आहे, लोकांना आरोग्यसेवा चांगली मिळावी म्हणूनदेखील एक नवी योजना सुरु झाली आहे.
भाजपने नेतृत्वाच्या प्रश्नावर माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांना गॅसवर ठेवल्याने आपण परत बाजी मारू असा गेहलोत यांचा होरा दिसतोय. काहीही करून ते सचिन पायलटला मुख्यमंत्री बनू देणार नाहीत हे नक्की. लोकसभा निवडणुकीला एक वर्ष उरले असताना आता एकेक मल्ल प्रतिस्पर्ध्याचा अंदाज घेत आहे. कौन कौन कितने पानी में’ बघत आहे. कोणाच्या मनगटात जोर आहे की केवळ तोंडातच हे बघितले जात आहे. कर्नाटकात काँग्रेसने जवळजवळ सारे उमेदवार जाहीर करूनही भाजपने चालवलेला वेळकाढूपणा पक्षात सारे काही आलबेल नाही असेच भासवत आहे. बंगळूरुवर कोणाचे राज्य येणार त्यावर पुढील राजकारण ठरणार आहे. आरपारची लढाई सुरु होणार आहे.
सुनील गाताडे








