श्रीराम नवरात्राच्या पहिल्या दिवशी म्हणजे अर्थात गुढीपाडव्याला पायापडी नावाचा एक संस्कार पूर्वी प्रचलित होता. संध्याकाळी रामरक्षा व स्तोत्रे म्हणून झाली की वयाने मोठय़ा असणाऱया प्रत्येकाच्या पाया पडायचे. म्हणजे घरातले चुलत, आत्येभाऊ-बहीण, एकमेकांपेक्षा अगदी दोन दिवसांनी जरी लहान असतील तरी त्यांनी दोन दिवसांनी मोठे असलेल्यांना वाकून नमस्कार करायचा. यात मोठी गंमत असायची. थट्टामस्करीला उत यायचा. वडील मंडळींची आज्ञा प्रमाण असल्यामुळे सगळेजण निमूटपणे मोठय़ांना नमस्कार करायचे. सणाच्या दिवशी सारे नातेवाईक एकत्र जमलेले असायचे. त्यात रुसवे-फुगवे बरेच असायचे. ते नमस्काराच्या निमित्ताने मिटून जायचे. अहंकार बाजूला ठेवून नमस्कार केला की आपोआप नम्रता हा गुण उमलून येतो. तो मनामनाला भावतो. जो नमस्कार करतो त्याला आशीर्वाद मिळतो.
नित्य नमस्कार करण्याचे चार फायदे आहेत. आयुष्य, विद्या, यश आणि बल. भारतीय संस्कृतीमध्ये नवजात बाळाच्या अबोध मनात रुजवणारा एक संस्कार आहे. बाळ सव्वा महिन्यांचे झाले की त्याला पहिल्यांदा देवळात न्यायचे. देवाच्या पायाजवळ ठेवायचे. त्याचे चिमुकले डोके परमेश्वराच्या पायावर टेकवले की वडिलधाऱया मंडळींना कृतकृत्य वाटते. नमस्काराचे मोल जाणणारा खरा श्रीमंत असतो. श्रीमद् भागवतामध्ये ध्रुव बाळाची कथा आहे. ध्रुव बाळाला त्याच्या सावत्र आईने म्हणजे सुरुचीने उत्तानपाद राजाच्या म्हणजे ध्रुव बाळाच्या वडिलांच्या मांडीवरून ढकलून दिले आणि ती म्हणाली, ‘राजाच्या मांडीवर बसायला पात्रता हवी. तू वनात जा. तप कर. माझ्यासारख्या लाडक्मया राणीच्या पोटी जन्म घे व मग पित्याच्या मांडीवर बस.’ अपमानित झालेला पाच वर्षांचा ध्रुव बाळ आपल्या आईकडे-सुनीतीकडे गेला आणि त्याने घडलेले कथन केले. ती म्हणाली, ‘बाळा, तुझ्या सावत्र आईने योग्य तेच सांगितले आहे.
आपल्या सर्वांचे खरे पिता हे परमात्मा आहेत. त्यांच्या चरणकमलांची आराधना केलीस तर ते तुला नेहमीसाठी त्यांच्या मांडीवर बसवतील. ध्रुव बाळ मातेच्या आज्ञेनुसार वनात जायला निघाला तेव्हा त्याने प्रथम आपल्या आईला वंदन केले. डोंगरे महाराज ही कथा सांगताना समाजमनावर एक संस्कार घडवत, तो नमस्काराचा. ते म्हणतात, ‘ध्रुवाच्या आईने त्याला वनात जाण्यापूर्वी आपल्या सावत्र आईला नमस्कार करायला पाठवले. कारण जीवनाचे कल्याण व्हावे असे वाटत असेल तर कुणाविषयी मनात द्वेष असू नये. ईश्वराची आराधना सफल होण्यासाठी मन शुद्ध असावे लागते. आपल्या सावत्र आईविषयी मनात कुभाव ठेवून जर तो नारायणाचे ध्यान करेल तर ते शक्मय होणार नाही. ध्रुवाच्या मनात सतत सुरुचीविषयी वाईट विचार येत राहतील. मातेच्या सांगण्यावरून ध्रुवबाळ सावत्र आईला नमस्कार करायला गेला. तिला साष्टांग नमस्कार घालताच ती म्हणाली, ‘तू कां बरे मला नमस्कार करतो आहेस? ध्रुव म्हणाला, मी वनात तप करायला चाललो आहे, म्हणून तुझे आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहे’. दुष्ट प्रवृत्तीच्या सुरुचीचे मन ध्रुवाच्या या कृतीमुळे क्षणभर का होईना पाझरले. ती म्हणाली, ‘ठीक आहे. तू वनात जातो आहेस, तुला माझा आशीर्वाद आहे’. डोंगरे महाराज पुढे म्हणतात, ‘सर्वांना नमस्कार करून, त्यांचे आशीर्वाद घेऊन तुम्ही उपासनेसाठी तीर्थक्षेत्री जाता तेव्हा तुम्हाला रस्त्यात संतांचे दर्शन होते हे निश्चित. भांडणे करून घराबाहेर पडलात तर ना राम मिळत ना प्रेम.’
नमस्काराचे अनेक प्रकार आहेत. दुर्जन दिसला की त्याला प्रथम वंदन करावे. दुर्जनं प्रथमं वंदे. संत एकनाथ महाराज म्हणतात, आडवा डोंगर तयाला माझा नमस्कार. आपल्या कार्यात विघ्न आणू नये म्हणून असलेला हा नमस्कार मनातले भय प्रकट करतो. कोपरापासून नमस्कार. त्रास देणाऱया माणसाने पुन्हा भेटू नये म्हणून हा नमस्कार. देखल्या देवा दंडवत. गरजवंताला अक्कल नसते म्हणून हा नमस्कार. या सगळय़ांपेक्षा कृतज्ञतापूर्वक केलेला भावपूर्ण नमस्कार परमेश्वराला पोहोचतो. दोन्ही हात जोडून मनःपूर्वक केलेला नमस्कार जसा देवाला पावतो तसा नमस्काराचा उत्तम प्रकार म्हणजे साष्टांग दंडवत. संतश्रे÷ ज्ञानदेव माऊली म्हणतात, गुरू, देव, संत यांना काठी खाली पडते तसा नमस्कार घालावा. त्यांच्या चरणांवर आपले डोके असावे. नम्रता, आदर्श, श्रद्धा आणि शरणांगता या संस्कारांनी भारित असलेले मन कुणी सांगण्यापूर्वी नमस्काराला वाकते ते श्रे÷ असते.
समर्थ रामदास स्वामी वंदनभक्ती सांगताना म्हणतात,
‘नमस्कारास वेचावे नलगे, नमस्कारास कष्टावे नलगे
नमस्कारास काहीच नलगे, उपकर्ण सामग्री’
— ही सृष्टी भगवंताची आहे. हे शरीर तरी आपले, स्वतःचे कुठे आहे? ते त्याने दिलेले त्याचे आहे. इंद्रियांवर सत्ताही त्याचीच आहे हे जाणून कृतज्ञतापूर्वक नमस्कार करून परमेश्वराच्या ऋणातून किंचित उतराई होता येते. साग्रसंगीत पूजेसाठी साहित्य लागते. मात्र नमस्कारासाठी फक्त भावपूर्ण ओलावा असलेले अंतःकरण लागते. समर्थ पुढे म्हणतात, ‘नमस्कारा ऐसे नाही सोपे, नमस्कार करावा अनन्यरूपे’. नमस्कार सोपा कुणासाठी आहे तर ज्याचे अंतःकरण निर्मळ, निष्पाप आहे, मनात अहंकाराचे फुत्कार करणारा नाग ज्यांच्या मनात नाही त्यांना. पात्र, अपात्र, मानसन्मान, अपमान असे द्वंद ज्यांच्या मनाला स्पर्श करत नाही तो कृतज्ञतापूर्वक जिवाला शिव मानून अनन्यरूपाने झुकतो. पंढरीचे वारकरी एकमेकांना माऊली, माऊली म्हणत नमस्कार करतात.
संत तुकाराम महाराज म्हणतात, ‘खेळ मांडियेला वाळवंटी ठाई, नाचती वैष्णव भाई रे’. वारकरी हे पांडुरंगाशी एवढे एकरूप होतात की ‘क्रोध अभिमान केला पावटणी, एकएका लागतील पायी रे’. क्रोध आणि अभिमान यांची पायाखालील पायरी करून ते एकमेकांच्या पाया पडतात.
नमस्कार कसा करावा याचेही शास्त्र आहे. एका हाताने केलेला नमस्कार शास्त्राच्या विरुद्ध आहे. यामुळे नमस्कार घेणाऱया माणसाच्या शरीरातील फक्त नकारात्मक ऊर्जा ही परावर्तीत होते. पू. बापट गुरुजी असे म्हणतात की, प्रत्येक मानव पिंडात विद्युत आकर्षणशक्ती असते. ही धन आणि ऋण अशा दोन प्रकारची असते. म्हणून डाव्या हाताने उजव्या आणि उजव्या हाताने डाव्या पायाला स्पर्श करण्याची पद्धत आहे. यामुळे शक्तीचे संक्रमण समान रूपात होते.
समाजामध्ये काही लोक असे असतात की ज्यांना नमस्कार करून घ्यायला अजिबात आवडत नाही. त्यात स्वभावानुसार तत्व असते. परंतु नमस्कार स्वीकारणे ही एक मोठी जबाबदारी आहे. सद्गुरूंना नमस्कार केला की ते साधकांची पातके स्वीकारतात आणि आपला हात त्यांच्या डोक्मयावर ठेवतात. सद्गुरूंच्या हातातल्या बोटांमध्ये पंचमहाभूतांच्या उर्जेचा स्रोत असतो. संतांच्या हातामध्ये असलेली विद्युतशक्ती शिष्याच्या मस्तकात संक्रमित
होते.
नमस्कार म्हणजे कृतज्ञता पितरांचे स्मरण म्हणजे श्राद्ध. श्राद्धाचे अनेक प्रकार आहेत. त्यात एक म्हणजे प्रार्थनाश्राद्ध. निर्जन स्थळी किंवा घरातल्या बंद खोलीत पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून उभे राहावे. पितृदेवांची क्षमा मागून म्हणावे, सद्यस्थितीत माझ्याजवळ काहीही वस्तू किंवा पदार्थ नाहीत. मी फक्त आदरपूर्वक, स्मरणपूर्वक आपल्याला अनन्य भावाने नमस्कार करतो. हे श्राद्ध पितरांना पोहोचते. पितरांचा स्मृतिदिन दोन्ही हात जोडून नमस्कार करीत श्रद्धापूर्वक केला तरी तो सार्थ होतो. शब्दांशिवाय कृतज्ञता व्यक्त करणारी कृती म्हणजे नमस्कार. दिवसभर ज्यांनी आपल्यावर उपकार केले त्यांना जाणीवपूर्वक रात्री नमस्कार करून झोपावे आणि सकाळ उजाडताच पुन्हा सृष्टीला नमस्कार करून कामाला लागावे. ही सुद्धा महत्त्वाची उपासना आहे.
– स्नेहा शिनखेडे








