वृत्तसंस्था/ वारंगल
एसएससी पेपर लीक प्रकरणात तेलंगणा भाजपचे अध्यक्ष बंदी संजयकुमार यांना जामीन मिळाला आहे. शुक्रवारी त्यांची तुरुगातून सुटका झाली. वारंगल दंडाधिकारी न्यायालयाने गुरुवारी संजयकुमार यांना 20 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला होता. जामीन मंजूर करताना न्यायालयाने त्यांना काही महत्त्वपूर्ण अटी-शर्थी घातल्या आहे. या अटींमध्ये देश सोडणार नाही, तपासात सहकार्य करेन आणि साक्षीदारांना धमकावणार नाही किंवा दबाव टाकणार नाही आदींचा समावेश आहे.
बंदी संजयकुमार तेलंगणातील करीमनगरमधून लोकसभेचे खासदार आहेत. एसएससी हिंदी पेपर लीक प्रकरणी मंगळवारी रात्री उशिरा पोलिसांनी त्यांना अटक केली. बुधवारी अटकेत असलेल्या संजयकुमार यांच्यासह चौघांना दोन आठवड्यांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाकडून त्यांना कोणताही दिलासा मिळाला नाही. न्यायालयाने त्यांना स्थानिक न्यायालयात याचिका दाखल करण्यास सांगितले होते. यासोबतच या प्रकरणाची सुनावणी 10 एप्रिलला होणार असल्याचे सांगण्यात आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य माध्यमिक शाळा प्रमाणपत्र (एसएससी) बोर्डाची हिंदी परीक्षा 4 एप्रिल रोजी वारंगलमध्ये सुरू झाल्यानंतर काही वेळातच हा पेपर फुटला होता. याप्रकरणी पोलिसांनी संजयकुमार याला आरोपी बनवले होते. त्यांच्यावर आयपीसीच्या कलम 120बी (गुन्हेगारी कट), 420 (फसवणूक) आणि कलम 505 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.









