लढाऊ विमान प्रथमच देशाबाहेर ः युएईमधील ‘डेझर्ट फ्लॅग’मध्ये 10 देशांचा सहभाग
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारतीय हवाई दलाने प्रथमच लढाऊ विमान तेजस हे लष्करी सरावासाठी देशाबाहेर पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. हवाई दलाने याबाबत अधिकृत माहिती दिली आहे. 27 फेब्रुवारी ते 17 मार्च दरम्यान संयुक्त अरब अमिरातीमध्ये (युएई) ‘डेझर्ट फ्लॅग’ नावाचा लष्करी सराव होणार आहे. यामध्ये भारताकडून 5 हलकी लढाऊ विमाने तेजस आणि 2 ‘सी-17’ विमानांचा समावेश केला जाणार असल्याचे एका वरि÷ अधिकाऱयाने सांगितले.
भारतीय हवाई दलाकडून पहिल्यांदाच तेजसला लष्करी सरावासाठी पाठवले जात आहे. ‘डेझर्ट फ्लॅग’ लष्करी सराव कार्यक्रमात युएई, फ्रान्स, कुवेत, ऑस्ट्रेलिया, ब्रिटन, बहरीन, मोरोक्को, स्पेन, दक्षिण कोरिया आणि अमेरिका या देशांच्या हवाई दलांचा समावेश असणार आहे. या सरावादरम्यान भारतीय दलाला आपल्या हवाई क्षमतेचे कसब इतर देशांसमोर मांडता येणार आहे. अशा बहुदेशीय कार्यक्रमांमध्ये घेतलेल्या सहभागामुळे देशाला दूरगामी फायदा होणार असल्याचा दावा केला जात आहे.
18 वर्षांच्या अथक परिश्रमानंतर जानेवारी 2001 मध्ये पहिल्यांदाच तेजस स्वदेशी फायटर जेट भारताच्या आकाशात झेपावले होते. याप्रसंगी अटलबिहारी वाजपेयी देशाचे पंतप्रधान होते. 2003 मध्ये वाजपेयींनीच सदर लढाऊ विमानाचे ‘तेजस’ असे नामकरण केले होते. तेजस हा संस्कृत शब्द असून त्याचा अर्थ ‘चमकणारा’ असा असल्याचे प्रतिपादन तत्कालीन पंतप्रधान वाजपेयी यांनी केले होते. त्यांच्या या दाव्यानुसार भारताचे ‘तेजस’ चमक दाखवत आहे. सध्या भारतीय हवाई दलाच्या ताफ्यातील सर्वोच्च लढाऊ विमानांमध्ये सुखोई, राफेल, मिराज, मिग-29 आणि तेजस यांचा समावेश आहे. वैशिष्टय़पूर्णतेमुळे ‘तेजस’ उर्वरित चार लढाऊ विमानांपेक्षा वेगळे आणि खास आहे.
गेल्या पाच दशकात 400 हून अधिक मिग-21 विमाने कोसळल्यामुळे भारत सरकारला ते बदलायचे होते. त्यानुसार आता ‘मिग-21’ची जागा ‘तेजस’ने घेतली आहे. या विमानाचे वजन कमी असल्याने ते समुद्रातील जहाजांवरूनही सहज लँडिंग आणि टेक ऑफ करू शकते. तसेच त्याची शस्त्रे वाहून नेण्याची क्षमता मिग-21 पेक्षा दुप्पट आहे. वेगाबद्दल बोलायचे झाले तर ‘तेजस’चा वेग ‘राफेल’पेक्षा 300 किलोमीटर प्रतितास जास्त आहे.
जगातील सर्वात हलके विमान
सध्याचे तेजस हे ध्वनीपेक्षाही अधिक वेगाने उडणारे जगातील सर्वात हलके विमान ठरले आहे. त्याला एक इंजिन असून एकाच चालकाकडून ते उडविले जाते. आकाशातून आकाशात आणि आकाशातून जमिनीवर मारा करणारी क्षेपणास्त्रे, तसेच इतर विध्वंसक स्फोटके वाहून नेण्याची याची क्षमता आहे. हे विमान बव्हंशी भारतीय बनावटीचे असले तरी त्याचे काही महत्त्वाचे भाग विदेश निर्मित आहेत. यात विमानाचा सर्वात महत्त्वाचा भाग असणाऱया इंजिनचाही समावेश आहे. हे इंजिन अमेरिकेच्या जनरल इलेक्ट्रिक या कंपनीने तयार केले आहे. सध्या ‘तेजस मार्क-2’ या विमानाच्या अत्याधुनिक आवृत्तीवर काम यशस्वीपणे सुरू आहे. त्याचे उत्पादन 2025 च्या आसपास सुरू होण्याची अपेक्षा आहे. तेजस लढाऊ विमानाच्या अपग्रेड केलेल्या आवृत्तीत मोठी रचना, लांब पल्ल्याची क्षमता असेल. एवढेच नव्हे तर त्याच्या देखभाल-दुरुस्तीच्या समस्येची दखलही ‘एचएएल’कडून घेतली जाणार आहे.
प्रमुख वैशिष्टय़े…
जगातील सर्वात हलके आणि सर्वात छोटे, स्वनातीत विमान
एक चालक आणि एक इंजिन, अत्याधुनिक रडारने सज्ज
‘फ्लाईंग डॅगर्स’ या नावाने परिचित, ‘मिग 21’ ला पर्याय
क्षेपणास्त्रे, गन, इलेक्ट्रिक स्कॅनर रडार इत्यादी शस्त्रसंभार
पंखांची सुयोग्य जाडी आणि विस्तारामुळे निर्दोष उड्डाण
सुबक रचना…
पंखांचा विस्तार ः 8.20 मीटर
विमानाची लांबी ः 13.20 मीटर
विमानाची उंची ः 4.40 मीटर
उड्डाणभार क्षमता ः 9,800 किलो
रिक्तस्थिती वजन ः 6,560 किलो
शस्त्रे, सामग्री ः 3,500 किलो
अधिकतम वेग ः 1,275 किलोमीटर प्रतितास
अधिकतम उंची ः 50 हजार फूट









