टी 20 वर्ल्डकपसह आयपीएलचा धमाका, अफगाणविरुद्ध टी 20 मालिकेने नव्या वर्षाचा होणार प्रारंभ
वृत्तसंस्था/ मुंबई
टीम इंडिया सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात टीम इंडिया टी 20, वनडे व कसोटी मालिका खेळत आहे. वनडे व टी 20 मालिकेत यश प्राप्त केल्यानंतर कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताचा पराभव झाला. आता भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा कसोटी सामना 3 जानेवारीपासून खेळवला जाणार आहे. विशेष म्हणजे, या केपटाउन कसोटी सामन्याद्वारे टीम इंडिया नवीन वर्षाची सुरुवात करेल. यानंतर भारतीय संघ अफगाणिस्तानविरुद्ध टी 20 मालिका खेळणार आहे.
2023 वर्ष भारतीय संघासाठी संमिश्र ठरले, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. आयसीसी टेस्ट चॅम्पियनशिप व आयसीसी वनडे वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय संघाला अंतिम क्षणी पराभवाचा सामना करावा लागला. हा अपवाद वगळता इतर वनडे व टी 20 सामन्यात रोहितच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने शानदार कामगिरी साकारली. 2023 वर्ष संपण्यास केवळ एक दिवस बाकी आहे. मागील वर्षातील कटु आठवणी मागे टाकत नव्या वर्षाचा प्रारंभ विजयाने करण्यासाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे.
केपटाऊन कसोटीने नववर्षारंभ
आफ्रिका दौऱ्यावर असलेल्या रोहितच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला पहिल्या कसोटीत डावाने पराभवाचा सामना करावा लागला. आता, उभय संघात तीन जानेवारीपासून दुसरी कसोटी खेळवण्यात येणार आहे. ही कसोटी जिंकत टीम इंडियाचा बरोबरी साधण्याचा प्रयत्न असेल, याशिवाय नवीन वर्षाची सुरुवात दमदार करण्यासाठी रोहितसेनेचा प्रयत्न असणार आहे.
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात 3 टी 20 सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. उभय संघांमधला पहिला टी 20 सामना 11 जानेवारी रोजी मोहाली येथे खेळवला जाणार आहे. यानंतर दुसरा सामना 14 जानेवारीला ग्वाल्हेरमध्ये तर तिसरा सामना 17 जानेवारीला बेंगळूरमध्ये होईल. अफगाणिस्तानविरुद्ध टी 20 मालिका संपल्यानंतर लगेचच इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात 5 कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेतील पहिली कसोटी 25 जानेवारीपासून हैदराबादमध्ये खेळवली जाणार आहे. दुसरी कसोटी विशाखापट्टणम, तिसरी कसोटी राजकोट, चौथी कसोटी रांची तर पाचवी कसोटी धरमशाला येथे होणार आहे.
आयपीएल, टी 20 वर्ल्डकपचा धमाका
भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेनंतर जगातील सर्वात लोकप्रिय अशा इंडियन प्रीमियर लीगचा थरार रंगणार आहे. अद्याप आयपीएलचे वेळापत्रक जाहीर झाले नसले तरी मार्चच्या शेवटच्या आठवड्यात ही स्पर्धा होण्याची शक्यता आहे. मेच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात आयपीएलचा अंतिम सामना झाल्यानंतर अवघ्या काही दिवसात टीम इंडिया आयसीसी टी 20 वर्ल्डकपसाठी वेस्ट इंडिजला रवाना होणार आहे. यंदाची टी 20 वर्ल्डकप अमेरिका व वेस्ट इंडिजमध्ये होणार आहे. यामुळे टीम इंडियाची कामगिरी कशी होते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.









