प्रतिनिधी/ बेळगाव
विजय दिवस भारतासाठी महत्त्वाचा दिवस आहे. युद्धाच्यावेळी बलिदान दिलेल्या सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांचा गौरव करणे हे आपले कर्तव्य आहे. प्रत्येकांनी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांचे गौरव करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी केले.
जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात शनिवारी सशस्त्र दलाचे ध्वज दिन व विजय दिवस-2023 कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमात शहीद सैनिकांच्या पत्नींचा व 1971 च्या पाकिस्तान बरोबरच्या युद्धात जखमी झालेल्या सैनिकांचाही सत्कार करण्यात आला.
खरे तर 7 डिसेंबर रोजी सशस्त्र दलांचे ध्वज दिन व 16 डिसेंबर रोजी विजय दिवस देशभरात साजरा केला जातो. 4 ते 15 डिसेंबरपर्यंत बेळगाव येथे विधिमंडळाचे अधिवेशन सुरू होते. त्यामुळे शनिवारी विजय दिवस साजरा करण्यात आला. देशरक्षणासाठी दरवर्षी एक हजारहून अधिक सैनिक आपले बलिदान देतात. हा त्याग व बलिदानासाठी त्या सैनिकांचे कुटुंबीयही तितकेच प्रमुख आहेत, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
पाकिस्तान बरोबरच्या युद्धात शहीद झालेल्या सैनिकांच्या पत्नींचा व जखमी सैनिकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा सैनिक कल्याण व पुनर्वसन खात्याच्या निवृत्त सहसंचालिका कमांडंट इंदूप्रभा व्ही., एनसीसीचे कर्नल मोहन नायक आदी उपस्थित होते.









