वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेड (टीपीइएमएल) या टाटा मोटर्सच्या सहकारी कंपनीने फोर्ड इंडियाच्या ताब्यातील गुजरातमधील साणंदचा कारखाना खरेदी केला असल्याची माहिती आहे.
सदरची खरेदी करण्यासाठी टाटाने 725 कोटी रुपये मोजले असल्याची माहिती आहे. यात कंपनीने संपूर्ण जागा, इमारत, निर्मिती प्रकल्प (मशीनरीसह) ताब्यात घेतल्याचे सांगण्यात येते.
दोन्ही कंपन्यांनी यासंबंधी कारखाना हस्तांतरण करारावर सहय़ा केल्या आहेत. याअंतर्गत सध्याच्या फोर्डमधील सर्व कर्मचारी टाटाकडे हस्तांतरीत होणार आहेत.
कारखान्यात 3 हजार 43 जणांना प्रत्यक्षपणे तर 20 हजार जणांना अप्रत्यक्षपणे नोकरी दिली जाणार आहे. फोर्डचा प्लांट 350 एकर क्षेत्रफळात विस्तारलेला असून 110 एकर जागेत इंजिन निर्मिती प्रक्रिया राबवली जाते.
गुजरात सरकार, टीपीइएमएल व फोर्ड यांच्यात तिहेरी करार करण्यासंबंधी 30 मे 2022 रोजी हिरवा कंदील मिळाला होता. या कारखान्यातून सध्याला वार्षिक 3 लाख कार्सचे उत्पादन घेतले जाते, जे 4 लाख 20 हजार पर्यंत वाढवता येणे आगामी काळात शक्य होणार आहे.









