वृत्तसंस्था/ दुबई
लंकेचा फिरकी गोलंदाज प्रभात जयसूर्या तसेच इंग्लंडची अष्टपैलू महिला क्रिकेटपटी एम्मा लॅम्ब यांची जुलै महिन्यातील आयसीसीतर्फे सर्वोत्तम क्रिकेटपटू म्हणून निवड करण्यात आली आहे.
आयसीसीतर्फे प्रत्येक महिन्याला पुरुष आणि महिलांच्या विभागात सर्वोत्तम क्रिकेटपटूची निवड विविध स्पर्धातील कामगिरीचा आढावा घेऊन केली जाते. लंकेचा 30 वर्षीय फिरकी गोलंदाज प्रभात जयसूर्याने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेत दर्जेदार कामगिरी करताना 12 गडी बाद केले. तसेच पाकविरुद्धच्या कसोटी मालिकेत जयसूर्याने 17 बळी मिळविले. या कामगिरीमुळे जयसूर्याची जुलै महिन्यातील सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटू म्हणून निवड करण्यात आली. या पुरस्कारासाठी प्रामुख्याने जयसूर्या, इंग्लंडचा बेअरस्टो आणि मॅकॉन यांच्यात चुरस होती.
महिलांच्या विभागात इंग्लंडची अष्टपैलू एम्मा लॅम्बची जुलै महिन्यातील सर्वोत्तम क्रिकेटपटू म्हणून निवड करण्यात आली. दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेत 24 वर्षीय लॅम्बने 234 धावा जमविल्या होत्या. या पुरस्कारासाठी नॅट स्किव्हेर, लॅम्ब आणि भारताची रेणुका सिंग यांच्यात चुरस होती.









