जिल्हाधिकाऱ्यांचे निवडणूक अधिकाऱ्यांना आदेश : सार्वजनिक ठिकाणावरील फलक, भित्तीपत्रके हटवा
बेळगाव : विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या असून बुधवारपासूनच आचारसंहिता लागू झाली आहे. आचारसंहितेचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई करण्याचा आदेश जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिला आहे. याचबरोबर सार्वजनिक ठिकाणी लावण्यात आलेले फलक, भित्तीपत्रके काढून टाकण्याची सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिली आहे. निवडणूक जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक अधिकारी व नोडल अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी हे आदेश दिले. विधानसभा मतदारक्षेत्रातील सर्व मतदान केंद्रांवर पायाभूत सुविधा उपलब्ध कराव्यात, प्रत्येक सेक्टर अधिकाऱ्याने मतदान केंद्राला भेट देऊन पायाभूत सुविधा उपलब्ध असल्याची खात्री करावी, कोणीही आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास तातडीने कायदेशीर कारवाई करावी, अशी सूचना त्यांनी केली. आचारसंहिता लागू झाल्यामुळे यापुढे रोख रक्कम, मद्य, भेटवस्तू आणि इतर वस्तूंच्या अवैधरित्या होणाऱ्या वाहतुकीवर करडी नजर ठेवा, तातडीने त्या वस्तू जप्त करा, कोणत्याही पक्षांचे किंवा व्यक्तीचे छायाचित्र आढळून आल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल करा, वाहनचालक तसेच इतर व्यक्ती दोषी आढळल्यास त्यांना अटक करा, अशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे. निवडणूक प्रचार कार्यक्रमासह इतर परवानगी देण्यासाठी एक खिडकी योजना सुरू करण्याचे आदेश त्यांनी दिले. आचारसंहिता लागू झाल्यामुळे अधिकाऱ्यांनी 24 तास संबंधित मतदारसंघामध्ये लक्ष ठेवून राहावे, राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक बोलावून त्यांना आचारसंहितेच्या नियमांबाबतची माहिती द्यावी, सरकारी विश्रामधाम किंवा सरकारी इमारतीमधील ज्या रिकाम्या खोल्या आहेत; त्या स्वच्छ करून अधिकाऱ्यांना वापरण्यासाठी द्याव्यात, जर कोठे अनधिकृतपणे मेळावा भरविण्यात येत असेल तर त्यांना परवानगी देऊ नये, असेही त्यांनी स्पष्ट केले. य् ाावेळी जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षल भोईर, याचबरोबर विविध मतदारसंघांचे निवडणूक अधिकारी, नोडल अधिकारी उपस्थित होते.
तस्करी करणाऱ्यांवर अधिक लक्ष
य् ााच बैठकीत पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांनी अवैध रक्कम, दारू तस्करी करणाऱ्यांवर अधिक लक्ष द्या, चेकपोस्टच्या ठिकाणी तपासणी काळजीपूर्वक करा, कोणत्याही प्रकारे हयगय करू नका, अशा सूचना केल्या. जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजीव पाटील म्हणाले, निवडणूक कार्यामध्ये सहभागी असलेले अधिकारी, कर्मचाऱ्यांनी ओळखपत्र वापरावे. निवडणूक प्रचारासंदर्भातील खोट्या बातम्या आढळून आल्यास तातडीने वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्याची नोंद करावी.









