मंत्री हसन मुश्रीफ-कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांना शिवसेनेचे निवेदन : गुन्हे दाखल करून सीमालढा कमकुवत करण्याचा प्रयत्न
बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीचे युवा नेते शुभम शेळके यांना तडीपार करण्याचा प्रयत्न बेळगाव पोलिसांकडून सुरू आहे. मराठी भाषा आणि संस्कृतीच्या जतनासाठी काम करणाऱ्या शुभम शेळके यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे बेळगाव पोलिसांची ही कारवाई रोखण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने मंत्री हसन मुश्रीफ व कोल्हापूर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. मराठी भाषेच्या चळवळीमध्ये भाग घेणाऱ्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करून सीमालढा कमकुवत करण्याचा प्रयत्न कर्नाटक सरकारकडून सुरू आहे.
युवकांवर गुन्हे दाखल केल्यास ते पुन्हा या लढ्यामध्ये येणार नाहीत, अशा भूमिकेतून गुन्हे दाखल केले जात आहेत. त्यामुळे युवा कार्यकर्त्यांवरील खोटे गुन्हे मागे घेण्यात यावेत. शुभम शेळके यांची हद्दपार रोखावी, शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनीही संसदेत यासंदर्भात प्रश्न उपस्थित करून सभापतींकडे विनंती केली होती. याचा संदर्भ देऊन कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पत्र पाठवावे, असे आवाहन निवेदनाद्वारे करण्यात आले आहे. यावेळी कोल्हापूर जिल्हाप्रमुख संजय पवार, सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, शिवसेना सीमाभाग जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर, महिला जिल्हा संघटक प्रतिज्ञा उत्तरे, अवधूत साळोखे, राजू जाधव, रमेश माळवी यासह इतर उपस्थित होते.









