खानापुरात हिंदुत्ववादी संघटनेतर्फे तहसीलदारांना निवेदन
खानापूर : पश्चिम बंगालमध्ये कायदा सुव्यवस्था पूर्णपणे ढासळलेली आहे. तसेच मुर्शिदाबादमध्ये हिंसाचार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. हा हिंसाचार रोखण्यात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना अपयश आले आहे. यासाठी त्यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा, तसेच पश्चिम बंगालमध्ये तात्काळ राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी तालुक्यातील हिंदुत्ववादी संघटनेच्यावतीने करण्यात आली. पंडित ओगले यांच्या नेतृत्वाखाली ममता बॅनर्जी यांचा निषेध करत खानापूर शहरातील लक्ष्मी मंदिरापासून तहसीलदार कार्यालयापर्यंत मोर्चा काढुन तहसीलदार दुंडाप्पा कोमार यांना सोमवारी यासंबंधी निवेदन देण्यात आले.
यावेळी भाजपचे आणि हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पश्चिम बंगाल राज्यातील मुर्शिदाबाद जिह्यात विशिष्ट समुदायाच्या एका गटाने हिंदू समाजाच्या लोकांची हत्या करून त्यांच्यावर हल्ले केले. तसेच हिंदू समुदायाचे मंदिर व घरे जाळण्यात आली. यामध्ये अनेक हिंदू लोक जखमी झाले. या हिंसाचारात इतर देशातील लोकांचाही सहभाग आहे. या प्रकरणतील संबंधित आरोपींना अटक करण्यासाठी आवश्यक ते निर्देश द्यावेत व कठोर शिक्षा व्हावी, तसेच पश्चिम बंगाल येथे राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, तालुकाध्यक्ष बसवराज सानिकोप, संजय कुबल, चेतन मणेरीकर, मल्लाप्पा मारीहाळ, शिवा मयेकर व अनेक भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.









