वृत्तसंस्था/ बर्लिन (जर्मनी)
डब्ल्यूटीए टूरवरील येथे होणाऱया बर्लिन खुल्या महिलांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेतून पोलंडची टॉप सीडेड महिला टेनिसपटू इगा स्वायटेकने दुखापतीमुळे माघार घेतली आहे.
खांद्याला झालेली दुखापत अद्याप पूर्णपणे बरी झाली नसल्याने आपण बर्लिन टेनिस स्पर्धेतून माघार घेत असल्याचे स्वायटेकने स्पर्धा आयोजकांना कळविले. अलीकडेच झालेल्या प्रेंच ग्रॅण्डस्लॅम टेनिस स्पर्धेत स्वायटेकने अजिंक्यपद मिळविताना अमेरिकेच्या गॉफचा अंतिम सामन्यात 6-1, 6-3 असा पराभव केला होता. स्वायटेकने प्रेंच ग्रॅण्डस्लॅम स्पर्धा दोनवेळा जिंकली आहे. यापूर्वी 2020 साली तिने पहिल्यांदा प्रेंच ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेचे जेतेपद मिळविले होते. 27 जूनपासून सुरू होणाऱया विम्बल्डन स्पर्धेत आपण निश्चित सहभागी होणार असल्याचे स्वायटेकने म्हटले आहे.









