वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कालावधी येत्या 25 जुलैला संपणार आहे. त्याआधी म्हणजेच 18 जुलैला राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. निवडणूक आयोगाने हा कार्यक्रम घोषित केला आहे. घटनेतील नियमानुसार विद्यमान राष्ट्रपतींचा कार्यकाल संपण्यापूर्वी निवडणूक घ्यावी लागते. सध्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे पारडे या निवडणुकीत जड दिसत आहे. गेल्या वेळी रामनाथ कोविंद यांना एकंदर 65.35 टक्के मते मिळाली होती. यंदाही रालोआला सहज बहुमत मिळेल, अशी शक्मयता आहे. तथापि, मागच्या इतके मताधिक्मय मिळणार नाही, असेही तज्ञांचे मत आहे. भाजपच्या खासदारांची संख्या मागच्या वेळेपेक्षा वाढली असली तरी शिवसेना व अकाली दलाचा पाठिंबा यंदा नसल्यामुळे निवडणूक अधिक चुरशीची होईल, अशी अटकळ व्यक्त केली जात आहे.









