उच्च न्यायालयाने सुनावली होती 7 वर्षांची शिक्षा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
उत्तरप्रदेशातील माजी आमदार मुख्तार अंसारी यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. अंसारींच्या याचिकेवर सुनावणी करत सर्वोच्च न्यायालयाने 19 वर्षे जुन्या प्रकरणातील शिक्षेला स्थगिती दिली आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाने अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाला अंतरिम स्थगिती दिली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने अंसारींच्या याचिकेवर सुनावणी करत उत्तरप्रदेश सरकारला नोटीस बजावली आहे. न्यायाधीश बी.आर. गवई आणि विक्रम नाथ यांच्या खंडपीठाने या याचिकेवर सुनावणी केली. अंसारी यांना 2003 साली तुरुंग अधिकाऱयाला धमकाविणे आणि रिव्हॉल्व्हर रोखून धरल्याप्रकरणी उच्च न्यायालयाने 7 वर्षांची शिक्षा सुनावली होती. या निर्णयाच्या विरोधात अंसारींनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मुख्तार अंसारी यांना पूर्वांचलमधील बाहुबली नेते म्हणून ओळखले जाते. अंसारी हे सध्या तुरुंगात असून त्यांच्या विरोधात अनेक गुन्हे नोंद आहेत.









