परराष्ट्र व्यवहार मंत्री जयशंकर यांचे प्रतिपादन
@ नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारताला जी-20 परिषदेचे अध्यक्षपद मिळणे ही मोठी कामगिरी आहे. सध्या जगाची अर्थव्यवस्था तणावात असून ते राजकीयदृष्टय़ा दुभंगलेले आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठा साखळय़ा तुटलेल्या आहेत. अशा स्थितीत भारताने हे उत्तरदायित्व स्वीकारले आहे, असे प्रतिपादन भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी केले. ते व्हिएन्ना येथे एका कार्यक्रमात बोलत होते.
हे अध्यक्षपद भारताला मिळणारच होते. त्यामुळे अशी कोणती मोठी घटना घडली आहे, असा प्रश्न काही लोक विचारतात. जरी हे अध्यक्षपद भारताला मिळणारच होते तरीही ही मोठी घटना आहे. कारण यामुळे जगातील आर्थिकदृष्टय़ा सर्वात प्रबळ देशांच्या सातत्याने संपर्कात राहण्याची संधी आम्हाला मिळाली आहे. सध्याच्या कठीण जागतिक परिस्थितीत या देशांच्या संपर्कात राहण्याची संधी भारताला मिळाली आहे. याचा देशाच्या अर्थव्यवस्थेलाही लाभ होणार आहे. भारता या संधीचा लाभ जगालाही मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहे. भारताच्या राजकीय इतिहासात इतका मोठा मान कधी मिळाला नव्हता, तो आता मिळत आहे. हे भारताच्या वाढत्या महत्वाचे लक्षण असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.
कोण पेक्षा केव्हा हे महत्वाचे
यानिमित्ताने भारतात कोण येत आहे यापेक्षा ते कधी येत आहेत हे महत्वाचे आहे. सधाची परिस्थिती लक्षात घेता भारताला अध्यक्षपदावरुन काम करण्याची संधी मिळते आहे याला मोठे महत्व आहे. सध्या जगाचे मोठय़ा प्रमाणात राजकीय ध्रूवीकरण झाले आहे. अशा स्थितीत परस्परविरोधी भूमिका घेणाऱया देशांचे प्रमुख भारतात एकत्र येऊन जागतिक स्थितीविषयी आणि अर्थव्यवस्थेविषयी चर्चा करणार आहेत. असामान्य अशा काळामध्ये भारताला हे उत्तरदायित्व मिळणे ही बाब लक्षणीय असून भारत उत्तरदायित्व सांभाळताना समतोल भूमिका घेऊन आपली सक्षमता सिद्ध करेल. येत्या काळात हे जगाला दिसेल असे प्रतिपादन त्यांनी केले.
ऑस्ट्रियाच्या दौऱयावर
जयशंकर सध्या दोन देशांच्या दौऱयावर आहेत. या दौऱयाच्या दुसऱया टप्प्यात ते सोमवारी ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्ना येथे पोहचले. त्यांनी या देशाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री अलेक्झांडर शेलेनबर्ग यांच्याशी द्विपक्षीय संबंधांवर चर्चा केली. त्यानंतर त्यांनी येथील भारतीय समुदायाकडून आयोजित कार्यक्रमात भाग घेतला.









