गुरुद्वारा शीख सेंटरमध्ये पंजवडची तसवीर : पाकिस्तानात मारला गेलेला दहशतवादी
वृत्तसंस्था/ फ्रँकफर्ट
जर्मनीच्या फ्रँकफर्ट येथील गुरुद्वारा शीख सेंटरमध्ये भारताकडून दहशतवादी घोषित करण्यात आलेला आणि पाकिस्तानात अलिकडेच मारला गेलेला दहशतवादी परमजीत सिंह पंजवडची तसवीर लावण्यात आली आहे. तसेच यावेळी खलिस्तानच्या समर्थनार्थ घोषणाबाजी झाली. याचरोबर खलिस्तानचा झेंडा फडकविण्यात आला आहे.
जर्मनीतील या गुरुद्वारामध्ये ब्ल्यू स्टार ऑपरेशनदरम्यान मारले गेलेल्या अन्य दहशतवाद्यांच्या तसवीरी देखील आहेत. खलिस्तान कमांडो फोर्सचा प्रमुख परमजीत सिंह पंजवडची 6 मे रोजी लाहोरमध्ये हत्या करण्यात आली होती. 1990 पासून तो पाकिस्तानात आश्रयास होता. तेथे तो मलिक सरदार सिंह या नावाने राहत होता.
पंजाबच्या तरनतारन जिल्ह्यातील पंजवार गावात पंजवड 1960 मध्ये जन्मला होता. केंद्रीय गृहमंत्रालयाने 2020 मध्ये 9 दहशतवाद्यांचा यादी जारी केली होती यात पंजवडचे नाव 8 व्या क्रमांकावर होते. या यादीत बब्बर खालसा इंटरनॅशनलचा प्रमुख वधावा सिंह बब्बरचे नाव देखील होते. तो तरनतारनच्या दासूवाल गावचा रहिवासी आहे.
अमली पदार्थ अन् शस्त्रास्त्रांची तस्करी
परमजीत सिंह पंजवड हा पाकिस्तानातून ड्रोनच्या माध्यमातून पंजाबमध्ये अमली पदार्थ आणि शस्त्रास्त्रांची तस्करी घडवून आणत होता. यातून मिळणाऱ्या पैशांद्वारेच त्याने खलिस्तान कमांडो फोर्सला सक्रीय ठेवले होते. पंजवडने 30 जून 1999 रोजी चंदीगडमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणला होता. पंजवड हा वधावा सिंह आणि लखवीर सिंह रोडे या दहशतवाद्यांसोबत मिळून दहशतवादी कारवायांसाठी कट रचत होता.









